RBI Governor : सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे. यावरुन आता केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँक समोरासमोर आली आहे. देशातील महागाई दराच्या आकड्यांबाबत सरकार आणि आरबीआयमध्ये अनेकदा चर्चा होत असते. मात्र, सार्वजनिक मंचावर महागाई आणि व्याजदरावर सरकार आणि आरबीआयची वेगवेगळी मते आज पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास हे दोघेही आज CNBC TV-18 ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये उपस्थित होते. या दोघांनी देशातील व्याजदरांबाबत आपापली भूमिका मांडली.
आरबीआयने व्याजदर कमी करावेत, पीयूष गोयल यांची मागणी
CNBC TV-18 च्या ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात RBI ने व्याजदरात कपात करावी, असे मत मांडले. पण, हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. डिसेंबरपर्यंत महागाईच्या दरात घट दिसून येईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असं गोयल म्हणाले. त्यांच्या मते, अन्नधान्याच्या महागाईत वाढ हे व्याजदर कपातीचे कारण म्हणून ते योग्य सिद्धांत मानत नाहीत.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मागणीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी उत्तर देणे टाळले. केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हसले आणि म्हणाले, "पुढील पतधोरण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. त्या वेळेसाठी मी माझी मते आणि कमेंट जपून ठेवतो... धन्यवाद."
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपली भूमिका बदलली आहे : शक्तीकांत दास
ग्लोबल समिटमधील महत्त्वाच्या भाषणात, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ऑक्टोबरच्या शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल न करता ६.५ टक्के व्याजदर स्थिर ठेवले आहे. वास्तविक, आरबीआयने आपली भूमिका बदलून 'न्यूट्रल' केली होती, जी आधी 'विथड्रॉवल ऑफ ॲकमोडेशन' होती. मात्र, अमेरिकेतील बदलत्या व्याजदराची परिस्थिती पाहता डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.