>> डॉ. पुष्कर कुलकर्णी
मागील भागात आपण कंपनी फंडामेंटल्स जाणून घेतले. आता तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे टेक्निकल. फंडामेंटल हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आवश्यक टूल आहे. टेक्निकल हे ट्रेडरसाठी आवश्यक टूल आहे.
टेक्निकल ॲनालिसिस
शेअरचा भाव त्याच्या मागील चढ-उतारावर आधारित चार्टवरून केलेला अभ्यास आणि त्यानुसार पुढील भाव काय असेल किंवा शेअरची पुढील दिशा कोणत्या बाजूला असेल याचा अंदाज. शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवरून त्याचा भाव ठरत असतो. विक्री जास्त आणि खरेदी कमी याचा अर्थ शेअरचा भाव खाली येणे आणि खरेदी जास्त आणि विक्री कमी याचा अर्थ शेअरचा भाव चढा राहणे. टेक्निकल अभ्यास करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत. जपानी पद्धती अधिक दृढ आणि प्रचलित आहेत. यातील पाच महत्त्वाच्या पद्धती आपण पाहू.
चार्ट पॅटर्न - प्रत्येक मिनिटाचा तसेच २, ५, १०, १५, ३० मिनिटांचा याचबरोबर १, २, ४ तासांचा आणि एक दिवस, एक आठवडा, एक महिना या विविध कालावधीसाठी शेअरचा चार्ट असतो. हा चार्ट बार चार्ट, लाईन चार्ट आणि कॅण्डल चार्ट या प्रकारात असतो. पुढील दिशा ठरविण्यासाठी मागील व्यवहार कसा झाला आहे, याचा डेटा या चार्टवरून काढून त्यानुसार अंदाज बांधले जातात. हे अंदाज बांधण्यासाठी शास्त्रीय पद्धती असतात. कॅण्डल चार्ट आणि विशिष्ट प्रकाच्या कॅण्डल फॉर्मेशनमुळे हे अंदाज बहुतांशी वेळेस बरोबर असतात.
हेही वाचाःअचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा!
हेही वाचाःडिव्हीडंड अन् बोनस शेअर कधी दिले जातात?; स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?.. जाणून घ्या!
आर एस आय (RSI) - Relative Strength Index - शेअर्स जसजसे खरेदी केले जातात, तसतसा त्याचा RSIवाढत जातो. या उलट विक्री जास्त होत असेल तर RSI कमी होत जातो. RSI ही एक पातळी असून तिचा टॉप १०० तर बॉटम ० असतो. सर्वसाधारण २० आणि त्यापेक्षा खाली RSI असणे म्हणजे शेअर ओव्हर सोल्ड पातळीवर असणे असे मानतात. म्हणजे बाजारात शेअर्सची विक्री जास्त प्रमाणात झाली आहे असे समजावे. या ठिकाणी इतर बाबी सकारात्मक असतील तर शेअरची खरेदी करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. RSI ८० च्या वर असणे म्हणजे शेअर्समध्ये जास्त खरेदी झाली आहे. इथं शेअर आता विक्रीसाठी तयार असून त्यात नफा वसुलीला प्राधान्य दिले जाते.
उदा. आयआरसीटीसी चा शेअर त्याच्या स्प्लिटपूर्वी ६,३९४ रुपयांच्या उच्चतम पातळीवर पोहोचला होता. यावेळेस त्याचा RSI ९२ च्या पातळीवर गेला होता. वाढीव भावात एका तासात नफा वसुली झाली आणि शेअरला लोअर सर्किट लागले होते.
मॅकडी (MACD) - Moving Average Convergence Diversion - या चार्ट मध्ये दोन लाईन्स असतात. एक मूव्हिंग ॲव्हरेज लाईन आणि दुसरी प्रत्यक्ष शेअरच्या खरेदी आणि विक्रीनुसार दर्शवणारी लाईन. जेव्हा दुसरी लाईन प्रथम लाईनला छेदून वरच्या दिशेने सरकते तेव्हा खरेदीचा सिग्नल असतो. या उलट जेव्हा लाईन छेदून खालच्या दिशेला जाते तेव्हा विक्री सिग्नल असतो. इंट्रा डे व्यवहार करणाऱ्यांसाठी याचा उपयोग अधिक होतो किंवा पोझिशनल ट्रेड घेणाऱ्या ट्रेडर्ससाठी सुद्धा हे सिग्नल्स योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतात.
RSI आणि MACD हे दोनही चार्ट्स आपल्या डिमॅट ॲपवर पाहू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो. इंट्रा डेसाठी १ ते १५ मिनिटे या दरम्यानची वेळ निवडून हे चार्ट पाहणे अधिक उचित असते. डिलिव्हरी बेस ट्रेड केल्यास एक दिवस हा ऑप्शन निवडून ५ दिवस, एक महिना हा कालावधीसाठी शेअर कोणत्या दिशेने जात आहे, त्यानुसार या दोनही चार्ट्सचा अभ्यास करून खरेदी किंवा विक्रीचा योग्य निर्णय घेणे उचित ठरते.
हेही वाचाः अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय?; ते कधी, कशामुळे लागतं?
व्हॉल्युम (Volume) - व्हॉल्युम म्हणजे शेअर्सची एकूण खरेदी आणि विक्री उलाढालीची संख्या दर्शविणारा चार्ट. ज्या दिवशी व्हॉल्युम अधिक असतो त्या दिवशी एक तर शेअरचा भाव चढा असतो किंवा खाली येतो. जितका जास्त व्हॉल्युम तितकी शेअर भावात अस्थिरता पाहावयास मिळते. इंट्रा डे ट्रेडर्ससाठी बाजारातून हमखास रिटर्न्स मिळतात ते या व्होलॅटिलिटीमुळेच. काही ट्रेडर्स नफा कमावून जातात तर काही ट्रेडर्स नुकसान सोसून बाहेर पडतात. जेव्हा शेअर उच्चतम पातळीवर असतो किंवा सपोर्ट लेव्हलवर ट्रेड करीत असतो तेव्हा एक तर तो सपोर्ट लेवल तोडून वरच्या दिशेला जातो किंवा खालच्या दिशेला येतो. हे करण्याचे कार्य खरेदी आणि विक्रीमधील व्हॉल्युम करीत असतो. त्यामुळे व्हॉल्युमवर लक्ष ठेवणे हे महत्त्वाचे असते.
मुव्हिंग ॲव्हरेज (Moving Average) - गेल्या काही दिवसांचा खरेदी आणि विक्रीचा व्हॉल्युम आणि त्याचा पॅटर्न यावरून १० दिवस, ५० दिवस आणि २०० दिवसांची सरासरी भावाची पातळी ठरली जाते. यालाच मुव्हिंग ॲव्हरेज म्हणतात. ५० दिवसांची पातळी तोडून भाव खाली आला तर भाव आणखीन खाली येण्याची शक्यता असते. तसेच २०० दिवसांची पातळी जेव्हा भाव गाठतो, तेव्हा भाव आकर्षक पातळीवर येतात. कंपनीच्या कामगिरीवरून हे ठरविता येते की, या भावात खरेदी करणे उचित आहे का त्या शेअरच्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे योग्य आहे.
पुढील भागात आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय ते जाणून घेऊ. (क्रमशः)