अनेक जण नोकरी सुरू करण्यासोबतच निवृत्तीचे नियोजनही सुरू करतात. बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शन म्हणून निश्चित रक्कम मिळू शकते किंवा एकरकमी निधी उभारता येतो. जेव्हा जेव्हा निवृत्तीबाबत गुंतवणूक करण्याचा विचार येतो तेव्हा राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे चालवली जाते. ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून कर बचतीचा फायदाही घेऊ शकता.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत वयाच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येईल. याशिवाय उर्वरित रक्कम तुम्ही पेन्शन म्हणून घेऊ शकता. यामध्ये गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा दिला जातो. कोणतीही व्यक्ती एका वर्षात एनपीएसमध्ये किमान 6000 रुपये गुंतवू शकते. योजनेच्या सुरुवातीला तुम्हाला एका निश्चित रकमेसह गुंतवणूक सुरू करावी लागेल. तसंच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते.
काय आहेत फायदे?
राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर बचत. या योजनेत गुंतवणूक करणारे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 150,000 रुपये तसेच कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या 7.1 टक्के व्याज मिळते. पण एनपीएसमध्ये गुंतवणूक करून दहा टक्के परतावा मिळू शकतो. एनपीएस खाती साधारणपणे दोन प्रकारची असतात. ज्यामध्ये पहिला टियर 1 आणि दुसरा टियर 2 आहे. टियर 1 मध्ये गुंतवणूक करणारे 60 वर्षांच्या वयानंतरच पैसे काढू शकतात. दुसरीकडे, टियर 2 लोकांसाठी अशी कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणूकदार कधीही पैसे जमा करू शकतात आणि काढूही शकतात.