आजच्या काळात एक कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड मोठा वाटू शकतो. याद्वारे तुम्ही घरही खरेदी करू शकता. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलू शकता. परंतु, १०, २० किंवा ३० वर्षांनंतर निवृत्तीच्या वेळी ही रक्कम पुरेशी असू शकेल का असा विचार केला आहे का? सत्य हे आहे की महागाईमुळे काळाच्या ओघात पैशाचं मूल्य कमी होतं. आज जी रक्कम मोठी वाटते ती भविष्यात आपल्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी ठरणार नाही. महागाई हळूहळू आपली परचेसिंग पॉवर कमी करते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक योजना आखणं का महत्वाचं आहे? हे आपण आज समजून घेऊया.
तुमच्या बँक खात्यात आज एक कोटी रुपये असतील तर ते तुम्हाला खूप वाटू शकतात. परंतु, भविष्यात ही रक्कम आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पुरेशी ठरणार नाही. कारण महागाईमुळे पैशाचं मूल्य कालांतरानं कमी होतं. उदाहरणार्थ, जर आज एखाद्या कारची किंमत १० लाख रुपये असेल तर १५ वर्षांनंतर ती खूप जास्त असू शकते.
हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आपण १० किंवा १५ वर्षांपूर्वी किराणा किंवा भाड्यावर किती खर्च करत होता आणि आता आपण किती करता याचा विचार करा. महागाईमुळे पैशाचं मूल्य कसं कमी होतं हे या फरकावरून दिसून येतं. त्यामुळे आज एक कोटी रुपये खूप वाटत असले तरी भविष्यात ते पुरेसे ठरणार नाहीत.
१०,२०,३० वर्षांनी किती असेल मूल्य?
६ टक्के महागाई गृहीत धरली तर १० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचं मूल्य ५५.८४ लाख रुपयांवर येईल. महागाईचा दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो हे यावरून दिसून येतं. पुढे पाहिलं तर महागाईचा दर ६ टक्के गृहीत धरून २० वर्षांनंतर एक कोटी रुपयांचे मूल्य सुमारे ३१.१८ लाख रुपयांवर येईल. अखेर ३० वर्षांनंतर एक कोटी रुपयांची किंमत आजच्या नुसार सुमारे १७.४१ लाख रुपये होणार आहे.
नियोजन महत्त्वाचं
आपण अनेकदा आजच्या परचेसिंग पॉवरच्या आधारे आपलं आर्थिक नियोजन करतो. परंतु, कालांतरानं ही ती हळूहळू कमी होत जाते. तसंच, जर एखादी गुंतवणूक ६% परतावा देत असेल तर आपल्याला खरोखर फायदा होत नाही. याचं कारण म्हणजे ६ टक्के महागाईचा दर तुमचा परतावा पूर्णपणे संपवतो.