Join us

Govt Scheme Investment: भन्नाट सरकारी योजना! फक्त १० हजार रुपये भरा अन् ५१ लाख मिळवा; १८३ टक्के हमखास परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 3:14 PM

Govt Scheme Investment: देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

Govt Scheme Investment: जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणुकीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. FD किंवा RD ची गुंतवणूक चांगली मानली जात असली तरी त्यातून मिळणारा परतावा अन्य योजनांच्या तुलनेत कमी असतो. इक्विटीमध्ये जोखीम पत्करून गुंतवणूक करावी लागते. मात्र, यातच अशी एक सरकारी योजना आहे, ज्यात तुम्ही गुंतवणूक केल्यास तगडा परतावा मिळू शकतो. लहान बचतीवर जास्तीत जास्त व्याज मिळत आहे. त्याच वेळी, दीर्घ मुदतीत सुमारे ३ पट परतावा मिळण्याची हमी आहे.

ही सरकारी योजना म्हणजे सुकन्‍या समृद्धी योजना (SSY). ही योजना कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध होऊ शकते. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घ मुदतीची योजना आहे. या योजनेत मुलीचे उच्च शिक्षण ते लग्न अशी तुमची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. यावर आताच्या घडीला दरवर्षी ७.६ टक्के व्याज मिळत आहे. जे इतर लहान बचत एफडी, आरडी, एनएससी आणि पीपीएफ पेक्षा जास्त आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना १०० टक्के सुरक्षिततेची हमी असल्याचे सांगितले जात आहे. 

सुकन्या समृद्धी योजनेत टॅक्समधूनही मिळते सूट

सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. या EEE वर म्हणजेच कर सूट तीन वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध आहे. प्रथम, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, १.५० लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट. दुसरे म्हणजे, त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर नाही. तिसरे, मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.

या योजनेत १८३ टक्क्यांचा हमखास परतावा

सुकन्या समृद्धी योजनेचा वर्तमान व्याजदर ७.६ टक्के प्रतिवर्ष वर्ष आहे. यासाठी दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक गुंतवणूक १ लाख २० हजार रुपयांची होते. १५ वर्षांत ही गुंतवणूक १८ लाख रुपयांवर जाते. या योजनेच्या मॅच्युरिटीवर एकूण रक्कम ५०,९२,१२४ मिळू शकते. यामध्ये ३२,९२,१२४ रुपयांचा व्याजलाभ मिळतो. यानुसार, याचा एकूण परतावा १८३ टक्के होते. यंदा २०२२ मध्ये गुंतवणूक सुरू केल्यास सन २०४५ मध्ये मॅच्युरिटीचे पैसे मिळू शकतात. 

दरम्यान, SSY योजनेत तुम्ही दरवर्षी किमान २५० रुपये आणि कमाल १.५० लाख गुंतवू शकता. यामध्ये मासिक आधारावरही गुंतवणूक करता येते. SSY योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी २१ वर्षे आहे. जर तुम्ही १ वर्षाच्या मुलीसाठी खाते उघडले, तर त्याची २२ वर्षांत मॅच्युरिटी मिळेल. जर मुलगी ३ वर्षांची असेल, तर ती २४ वर्षात मॅच्युरिटी मिळेल. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात सुरुवातीची १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित वर्षात योजनेअंतर्गत निश्चित केलेले व्याज तुमच्या ठेवीवर मिळत राहते.

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक