पिंपरी : टपाल कार्यालयाकडून ‘टाटा एआयजी’चा ३९९ मध्ये अपघाती विमा देण्यात येत होता. आता या विम्यासोबत ‘बजाज एलायंज’चा देखील ३९६ रुपयांचा अपघाती विमा टपाल कार्यालयाकडून देण्यात येत आहे. या दोन्ही विम्यांमध्ये अपघात झाल्यास १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. मात्र, पोस्टाच्या या नव्या योजनेनुसार नागरिक ‘टाटा’ आणि ‘बजाज’ यांचा एकत्रित विमा घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना ७९५ रुपये खर्च येणार असून, त्या बदल्यात तब्बल २० लाख रुपयांचा अपघाती विमा विमाधारकाला मिळणार आहे.
अपघातात मृत्यू झाल्यास २० लाख
पोस्टाच्या ‘टाटा’ आणि ‘बजाज’ च्या विमा पॉलिसी एकत्रित घेतल्यानंतर अपघाती मृत्यू नंतर किंवा अपघातानंतर विमाधारकाच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मिळतील. दोन्ही पॉलिसीमागे प्रत्येकी दहा लाख रुपये मिळण्याची सुविधा आहे. त्याचा एकत्रित लाभ विमाधारकाच्या कुटुंबीयांना घेता येईल.
वर्षाला ७९५ रुपयांचा हप्ता
२० लाखांचा विमा हवा असणाऱ्यांना ‘टाटा’ आणि ‘बजाज’ या दोन्ही पॉलिसी एकत्र घेणे आवश्यक आहे. ‘टाटा’ची पॉलिसी ३९९ आणि ‘बजाज’ची ३९६ रुपयांची आहे. या दोन्ही पॉलिसी एकत्र घेण्यासाठी वर्षाला विमाधारकाला फक्त ७९५ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
ही कागदपत्रे लागणार
विमा काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये केवळ आधारकार्ड तसेच पॅनकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. शिवाय इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आवश्यक आहे. ते नसेल तर पोस्टातील कर्मचारी ते खाते काढून देतात. नागरिकांना या टपाल कार्यालयातून या योजनेचा लाभ घेता येतो.
वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा
‘बजाज’च्या विमा पॉलिसीमध्ये कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा आहे. मात्र, कंपनीकडे नोंदणी असणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे विमाधारकाने आपल्याजवळील कोणते रुग्णालय ‘बजाज’च्या विमा पॉलिसीमध्ये नोंद आहे, हे आवश्यक पाहून ठेवावे.
विमाधारकाला ७९५ रुपयांत तब्बल २० लाख रुपयांचा विमा घेता येणार आहे. या विम्याचे वितरण पिंपरीच्या पोस्ट कार्यालयामार्फत सुरू आहे.
- शरद लोहकरे, पोस्ट मास्तर, पिंपरी पोस्ट ऑफिस