Join us

50/30/20 Budgeting Rule: समजून घ्या फॉर्म्युला; गुंतवणूक, खर्चानंतरही होणार नाही पैशांच अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:35 PM

दर महिन्याला तुमचा खर्च आणि बचत याबाबत तुम्ही योग्यरितीनं निर्णय घेतल्यास तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू शकतो.

Money Saving Tips: तुम्हाला दर महिन्याला पगार मिळतो, पण तुमचे बजेट असंतुलित आहे. कुठे, किती खर्च करायचा आणि किती बचत करायची हे ठरवता येत नाही. परिणामी, तुम्हाला तुमचं मासिक बजेट कसे मॅनेज करावं याबद्दल काळजी वाटते. दर महिन्याला तुमचा खर्च आणि बचत याबाबत तुम्ही योग्यरितीनं निर्णय घेतल्यास तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू शकतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, मासिक बजेटसाठी ५०-३०-२० हा नियम आहे, जो तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. 

हा नियम तुमच्या बजेटचं तीन मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण करून बचत आणि खर्च करण्याची प्रक्रिया सुलभ करतो. यामध्ये तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. हे तुमचे वर्तमान खर्च प्रभावीपणे मॅनेज करताना तुमच्या भविष्यातील गरजांसाठी आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्यात मदत करू शकते. याबाबत अधिक जाणून घेऊ. 

गरजांसाठी ५० टक्के 

पगार आला की त्याचे पैसे तुम्ही ५०, ३०, २० फॉर्म्युलाने नियंत्रित करू शकता व घराचे बजेट बनवू शकता. सॅलरीड क्लास लोकांचा पगार महिन्याच्या २५ तारखेपासून दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होतो. यामुळे हे लोक महिन्याच्या १ ते १० तारखेला हप्ते निवडतात. ते त्या तारखेला आपोआप डेबिट होतात. यामुळे सॅलरी आल्यानंतर तुमचा आधी ५० टक्के हा हप्त्यांचा खर्च बाजूला ठेवा. 

हा तुमचा बेसिक खर्च आहे, ज्यात तुम्ही काहीही केले तरी बदल करू शकत नाही. यामध्ये घराचे भाडे, घराचा ईएमआय, कारचा ईएमआय, पेट्रोल, किराणा आदींचा खर्च येतो. यात इंटरनेट, मोबाईल रिचार्जदेखील आले. हा असा खर्च असतो ज्यात कपात करता येत नाही. यामुळे पगार येताच याचे पैसे बाजूला ठेवा. 

आवडीच्या गोष्टींसाठी ३० टक्के 

पगाराचा ३० टक्के भाग तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करू शकता. यामध्ये चित्रपट पाहणे, रेस्टॉरंटमध्ये जाणे, खेळ, फिरायला जाणे आदी करू शकता. हा ३० टक्क्यांचा वाटा खर्च करणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन फोन घेणे, सुट्टीत बाहेर जाणे आदी गोष्टींसाठी तुम्हाला पैसे मॅनेज करावे लागतील. यातील सर्वात गरजेचं काम आधी पूर्ण करा. 

बचतीसाठी २० टक्के 

५० टक्के आणि ३० टक्के पगार खर्च केला की तुमच्या हातात उरतो तो २० टक्के हिस्सा. हा हिस्सा खूप महत्वाचा आहे. ज्याकडे लोक नेहमीच दुर्लक्ष करतात आणि तो देखील खर्च करून टाकतात. हा हिस्सा तुमचे भविष्य, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. एखाद वेळेस आवडीच्या गोष्टींसाठी खर्च कमी केला तरी चालेल पण बचत ही कराच. 

म्यूचुअल फंडामध्ये (Mutual Fund) तुम्ही एसआयपी करू शकता. हेल्थ इंशुरन्स, टर्म इन्शुरन्स, एफडी, पोस्टाच्या योजनाच पेन्शन योजना आदींमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामुळे जेव्हा पगार येईल तेव्हा तेव्हा ५०, ३०, २० फॉर्म्युला विसरू नका.

टॅग्स :गुंतवणूक