आतापर्यंत मुंबईतील मोठ-मोठ्या प्रॉपर्टी डील्स चर्चेत यायच्या, मात्र आता राजधानी दिल्लीतील डीलने अनेकांचे लक्ष वेधले आहे. फूड डिलिव्हरी अॅप Zomato चे CEO दीपिंदर गोयल यांनी दिल्लीत सर्वात मोठा जमिनीचा सौदा केला आहे. दीपंदर यांनी डेरा मंडी परिसरात 5 एकर जमीन तब्बल 79 कोटी रुपयांना खरेदी केली. याशिवाय गोदरेज प्रॉपर्टीज, एक्सपेरियन डेव्हलपर्स, डीएलएफ होम्स डेव्हलपर्स आणि प्रेस्टीज ग्रुपनेही दिल्ली-एनसीआरमध्ये जमिनीचे मोठे सौदे केले आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये 314 एकर जमिनीचे 29 सौदे
एनरॉकच्या रिपोर्टनुसार, 2024 या आर्थिक वर्षात दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 314 एकर जमिनीचे 29 सौदे झाले असून, सर्वात मोठी डील दीपंदर गोयल यांनी केली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 273.9 कोटी रुपयांचे एकूण 23 जमिनीचे सौदे झाले होते. तर, गुरुग्राममध्ये 208.22 एकर जमिनीचे 22 सौदे झाले आहेत. यापैकी प्रत्येकी एक करार शैक्षणिक, निवासी आणि किरकोळ कारणांसाठी करण्यात आला आहे. उर्वरित 20 सौदे मार्च 2024 पर्यंत निवासी विकासासाठी झाले आहेत. तिकडे, फरीदाबादमध्येही 15 एकर जमिनीचा करारही झाला आहे.
गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमध्ये मोठे सौदे
गंगा रियल्टीने गुरुग्राममधील 8.35 एकर जमिनीसाठी 132 कोटी रुपये, एक्सपेरियन डेव्हलपर्सने गोल्फ कोर्स रोडवरील 4 एकर जमिनीसाठी 400 कोटी रुपये तर, नोएडा सेक्टर 145 मधील 5 एकर जमिनीसाठी 250 कोटी रुपयांचा करार केला. एनरॉक ग्रुपच्या उपाध्यक्षांच्या मते, मोठे बिल्डर्स आता दिल्ली-एनसीआरकडे वळत आहेत. घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 298 एकर जमिनीचे 26 सौदे केले जाऊ शकतात.