अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला दिलेल्या दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाचा बँकांनी आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे शेअर मार्केटमधील अदानी समूहाचे शेअर सपाटून पडले. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये, गोरगरीबांच्या भविष्याची तरतूद करणारी भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC कंपनीचेही कोट्यवधींचे नुकसान झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. आता, एलआयसी कंपनीने याबाबतचे स्पष्टीकरण दिलं आहे.
अदानी उद्योग समुहाला आपण दिलेले कर्ज हे मर्यादेच्या आत असून काळजीचे कारण नसल्याचे देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने म्हटले आहे. अदानी समूहाबाबत विपरित अहवाल असताना एलआयसी, स्टेट बँक यांनी कर्जपुरवठा सुरू ठेवल्याबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर, आता या बँक आणि एलआयसीकडून स्पष्टीकरण आलं आहे.
भारतीय जीवन आयुर्विमा कंपनीने सोमवारी एका पत्राद्वारे खुलासा केला आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर LIC कंपनीला नुकसान झाले नसून फायदाच झाल्याचे म्हटले आहे. एलआयसी सध्या २६ हजार कोटी रुपयांच्या फायद्यात असल्याचं एलआयसीने स्पष्ट केले. एलआयसीने अदानी कंपनीच्या सर्वच कंपन्यांमध्ये एकूण ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून २७ जानेवारी रोजीच्या बंद बाजारानुसार एलआयसीच्या या गुंतवणुकीची किंमत ५६,१४२ कोटी रुपये एवढी आहे.
अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आजमित्तीस विमा कंपनीने विक्री केल्यास कंपनीला ५६,१४२ कोटी रुपये मिळतील. जे एलआयसीने गुंतवणूक केलेल्या एकूण रकमेपेक्षा २६,०१६ कोटी एवढे जास्त आहेत. म्हणजे कंपनीला हा निव्वळ नफा आहे, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. दरम्यान, अदानींच्या कंपनीत एलआयसीने केलेली एकूण गुंतवणूक ही अंडर मॅनेजमेंट (AUM) च्या केवळ 0.975 टक्के एवढी आहे.
स्टेट बँकेनेही दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, याबाबत स्टेट बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार अदानी समूहाला दिलेले कर्ज हे रिझव्र्ह बँकेने आखून दिलेल्या ‘लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क’च्या मर्यादेत असून त्यामुळे दिलेल्या कर्जाला कोणताही धोका नाही. आमच्या कर्जांना धोका उत्पन्न होऊ शकेल अशा घटनांचा आढावा घेण्याची आमची पद्धत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडेही आमचे लक्ष आहे, असेही स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, आता एलआयसीनेही स्पष्टीकरण दिलं आहे.
स्वामीनाथन जे म्हणतात...
स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वामिनाथन जे यांनी सांगितले की, बँकेकडून मोठ्या कर्जाचा नियमितपणे आढावा घेतला जातो. सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण दिसत नाही. अदानी समूहाची बहुतांश संपादने ही विदेशी कर्जे किंवा भांडवली बाजारातून झाली आहेत. त्यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेला सध्या कोणतीही बाधा असल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबत दिलेला अहवाल हा भारत आणि भारतीय संस्थांवर केलेला पूर्वनियोजित हल्ला असून अहवालातील माहिती धांदात खोटी आहे, असा आरोप अदानी समूहाने केला आहे. अदानी समूहाने ४१३ पानांचे स्पष्टीकरण जारी केले. संस्थेने आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने हा अहवाल तयार केल्याचा दावा अदानी समूहाकडून करण्यात आला आहे.