Join us  

अदानी पोर्टवरील कामगारांचा संप; सरकारी कंपनीला दररोज 50 कोटींचे नुकसान...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 4:18 PM

RINL Per Day Loss: कामगारांच्या संपामुळे पोर्टवर 700 कोटी रुपयांचा माल अडकून बडला आहे.

Adani Port Labour Strike: उद्योगपती गौतम अदानी यांच्या एका कंपनीमुळे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) ला दररोज 40 ते 50 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अदानींच्या गंगावरम बंदर (आंध्र प्रदेश) येथील कामगारांच्या संपामुळे सरकारी कंपनीचे नुकसान होत आहे. RINL ने अदानी पोर्टला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. RINL चे अध्यक्ष आणि MD अतुल भट्ट यांनी 5 मे रोजी पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, कोकिंग कोळसा उपलब्ध नसल्यामुळे कंपनीला दररोज 40-50 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. बराच काळ मशिन्स बंद  पडल्यामुळेही नुकसान सोसावे लागत आहे.

कोकिंग कोळसा आणि 700 कोटी रुपयांचा चुना अडकलामीडिया रिपोर्ट्नुसार, अदानी पोर्टमध्ये सध्या 700 कोटी रुपयांचा कोकिंग कोळसा आणि चुनखडी आहे. 12 एप्रिलपासून सुरू झालेल्या कामगारांच्या संपामुळे स्टील बनवण्यासाठी लागणारा कोकिंग कोळशाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच, संपामुळे 30 हजार कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावरही परिणाम होणार आहे. या संपूर्ण नुकसानीची जबाबदारी एजीपीएलला घ्यावी लागणार आहे. 

16,000 कोटींहून अधिक किमतीची उपकरणे खराब होणारकोकिंग कोळसा पुरवठ्याअभावी स्टील बनवणाऱ्या कंपन्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मशिन्सच्या नुकसानाबरोबरच कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत आहे. आरआयएनएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, अतुल भट्ट यांनी वायझॅग जिल्ह्याच्या डीएमला पाठवलेल्या पत्रातही याचा उल्लेख केला आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाने एजीपीएलला कन्व्हेयर बेल्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कोळसा आरआयएनएलकडे नेण्याचे आदेश दिले आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास 16,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची उपकरणे खराब होतील, असे आरआयएनएलकडून सांगण्यात आले.

कामगार संपावर का गेले?मच्छीमार आणि अदानींच्या गंगावरम पोर्ट व्यवस्थापन यांच्यातील कलह संपाचे कारण आहे. मच्छिमारांनी वाढीव पगाराची मागणी केल्याने ही फाटाफूट झाली आहे. 2021 मध्ये अदानी यांनी हे बंदर ताब्यात घेतले होते. याच काळात या मच्छिमारांच्या जमिनीही बंदरासाठी देण्यात आल्या. यानंतर त्यांना बंदरातच काम देण्यात आले. मात्र आता त्यांना अधिक पगार देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. कामगार जास्त पगार आणि पेन्शनची मागणी करत आहेत. मात्र व्यवस्थापनाकडून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने ते संपावर गेले आहेत. या बंदराच्या माध्यमातून भारताचा व्यापार आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि आसियान देशांसारख्या मोठ्या बाजारपेठांशी जोडला जातो.

टॅग्स :अदानीव्यवसायगुंतवणूक