Adani vs Hindenberg : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, भारतातील एका मोठ्या सरकारी बँकेने अदानी समूहाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) नुकत्याच झालेल्या घोषणेमध्ये अदानी समूहासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. या बँकेचे म्हणणे आहे की, अदानी समूहाला यापुढेही बँकेकडून कर्ज हवे असल्यास त्यावर विचार केला जाऊ शकतो.
बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव चढ्ढा यांनी म्हटले की, अदानी समूहाने बँकेच्या अंडररायटिंग मानकांची पूर्तता केल्यास बँक ऑफ बडोदा अधिक कर्ज देण्यास तयार आहे. तसेच, अदानी समुहाच्या शेअर्समधील चढ-उतारामुळे आपण अजिबात घाबरत नसल्याचे बँकेने म्हटले आहे.
स्टॉकच्या चढ-उताराची काळजी करू नकाबँक ऑफ बडोदाचे म्हणणे आहे की, चांगले आणि वाईट दिवस येतात आणि जातात. यापूर्वीही अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची बँकेला काळजी नसल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही समूहाने नियमांनुसार अर्ज केल्यास बँक अधिक कर्ज देण्याचा विचार करेल. पण, अदानी समूहाशी बँकेच्या एकूण एक्सपोजरबद्दल काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. या महिन्याच्या सुरुवातीलाही बँक ऑफ बडोदाने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे सांगितले होते.
विशेष म्हणजे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्गच्या खुलाशानंतर हा मुद्दा भारतीय राजकारणातही जोरात गाजत आहे. केंद्र सरकार बँका आणि एलआयसीचे पैसे जाणूनबुजून बुडवल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, विरोधकांच्या आरोपानंतर बँकेच्या दिशेने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच एलआयसीने सांगितले की, अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक आता फायदेशीर आहे.
अदानी समूहाकडे बँकांचे किती पैसे?जम्मू आणि काश्मीर बँकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, सध्या त्यांच्याकडे अदानी समूहात 250 कोटी रुपयांचे एक्स्पोजर आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे अदानी समूहाकडे सुमारे 27,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे त्यांच्या एकूण कर्जाच्या केवळ 0.8 ते 0.9 टक्के आहे. पंजाब नॅशनल बँकेचे 7000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एलआयसीचे म्हणणे आहे की, अदानी समूहावर त्यांचे 36,474.78 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते इक्विटीच्या रूपात आहे.