Indian Economy: भारताच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळापासून जगावर मंदीचे सावट असताना भारताचीअर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे. आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) आशियाई विकास आऊटलूक अपडेटमध्ये, 2023-24 साठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.4% वर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, ADB ने 2024-25 साठी 6.7% विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे.
एडीबीच्या म्हणण्यानुसार, भारताचा विकास दर वाढण्यामागे वाढती मागणी आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.2 टक्के होता. देशाच्या अर्थव्यवस्थेत ही वाढ अशा वेळी नोंदवली गेली, जेव्हा अमेरिका आणि युरोपसह पाश्चात्य देशांच्या अर्थव्यवस्था प्रचंड महागाईच्या दबावाला बळी पडल्या होत्या. परंतु हे संकट अद्याप संपलेले नाही, कारण IMF च्या MD क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेत कमजोरी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताच्या विकास दराबाबत ADB चा अंदाज देशाच्या वाढत्या आर्थिक ताकदीचा पुरावा आहे. इतकेच नाही तर आर्थिक मंदीच्या काळात जॉर्जिव्हा यांनी भारताला चमकणारा तारा म्हटले आहे.
चलनवाढीबाबत ADB च्या अहवालात जाहीर केलेला अंदाज दिलासा देणारा आहे. महागाई दरात घट होण्याची प्रक्रिया सुरूच राहील आणि महागाई पुन्हा एकदा कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचू शकेल, असे सांगण्यात आले आहे. आपल्या अंदाजात, ADB ने म्हटले आहे की, या वर्षी विकसनशील देशांमध्ये महागाई दर 3.6% असू शकतो. त्याच वेळी, ADB ने पुढील वर्षी महागाई दर 3.4% राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या प्रकरणी आयएमएफकडून चांगली बातमी आलेली नाही. IMF चे म्हणणे आहे की, महागाई ही तूर्तास मोठी समस्या राहील. यासाठी केंद्रीय बँकांना त्यांचे चलनविषयक धोरण अधिक कठोर करावे लागेल.
कोरोना नंतर भारताने चमत्कार केलाएडीबीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अल्बर्ट पार्क म्हणाले की, आशिया आणि पॅसिफिक प्रदेश या साथीच्या आजारातून झपाट्याने सावरत आहेत. देशांतर्गत मागणी आणि सेवा क्षेत्राच्या क्रियाकलापांमध्ये झालेली वाढ, या वाढीला चालना देत आहे. याबरोबरच या भागातील अर्थव्यवस्थेतही सुधारणा होत आहे. भारताच्या निर्यातीतही जूनमध्ये 22% घट झाली आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी निर्यातीतील या घसरणीवर चिंता व्यक्त केली आहे. भारताचे बलस्थान असलेल्या रत्न-दागिने, चामडे आणि कपड्यांच्या निर्यातीत सातत्याने घट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या एकूण वाहन निर्यातीत 28% ने घट झाली आहे.
मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुकया अगोदर ब्रोकरेज कंपनी बर्नस्टीनच्या अलीकडील अहवालात भारताच्या विकासाचे कौतुक केले आहे. यामध्ये, गेल्या 9 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आल्याचा दावा करण्यात आला आहे. आता येत्या काही वर्षांत भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थेत सामील होण्यासाठी सज्ज होत आहे. ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारने ऐतिहासिक सुधारणा, महागाई नियंत्रण, आर्थिक समावेशन आणि डिजिटायझेशन या आघाडीवर केलेले उत्कृष्ट काम हे त्याचे कारण आहे. ऐतिहासिक सुधारणांमध्ये जीएसटी, रस्ते, बंदरे आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च या अहवालात नमूद करण्यात आला आहे.