Join us  

सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होतंय कठीण? का बांधली जात नाही परवडणारी घरे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 3:43 PM

Affordable Housing: कोविड कालावधीपासून परवडणाऱ्या विभागातील घरांच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे समोर आले आहेत.

India Real Estate Market : आपलं हक्काच घर असावं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र, शहरात दिवसेंदिवस घरांच्या किमती गगनाला भिडत चालल्या आहेत. अलीकडच्या काळात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणे अवघड झाल्याचे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत घर खरेदीदारांचे ५० लाखांपेक्षा कमी किमतीचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिली तर स्वस्तातली घरे का महाग झाली हेही लक्षात येईल.

परवडणारी घरे बांधणे कठीण का झाले आहे?रिअय इस्टेट क्षेत्रात ४५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंतच्या घरांना परवडणारी घरे म्हणतात. परंतु, ज्या प्रकारे जमिनीच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे परवडणारी घरे बांधणे कठीण झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार परवडणाऱ्या घरांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलली आहे का?नाइट फ्रँकच्या रिपोर्टनुसार, एकूण घरांच्या विक्रीपैकी ४६ टक्के घरे एक कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची आहेत. एकूण घरांच्या विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यानच्या घरांचा वाटा ३० टक्के आहे, तर ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीचा वाटा २४ टक्के आहे. बांधकाम व्यावसायिक केवळ ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांना लक्झरी सेगमेंट घरे मानतात. १.३ ते ३ कोटी रुपयांची घरे अप्पर मिड-प्रिमियम श्रेणीत मोडतात. तर यापेक्षा कमी किमतीची घरे परवडणाऱ्या विभागात येतात.

परवडणाऱ्या घरांची मागणी का कमी होत आहे?अहवालात म्हटले आहे की २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत १४ टक्के घट झाली आहे. या विभागातील एकूण २०,७६९ घरांची विक्री झाली आहे, जी २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत २३,०२६ युनिट्स होती. घराच्या किमती वाढणे, महागडे गृहकर्ज व्याजदर आणि मागणीचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे आहेत. किमती वाढल्यामुळे या किमतीच्या विभागातील गृहखरेदीदार बाजारापासून दूर राहिले आहेत. तर पुरवठा कमी होण्याबरोबरच परवडणारी घरे कमी तयार होत असल्यानेही या विभागातील घरे कमी विकली जात आहेत.

टॅग्स :बांधकाम उद्योगसुंदर गृहनियोजनबँकिंग क्षेत्र