रिझर्व्ह बँकेनं सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँक, येस बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, इक्विटास आणि शिवालिक स्मॉल फायनान्स बँकेसह अनेक बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलेत. म्हणजेच आता ज्या गुंतवणूकदारांकडे एफडी आहे त्यांना कमी परतावा मिळणार आहे. जर तुम्हीही एफडी घेण्याचा विचार करत असाल आणि कमी व्याज दर मिळण्याची चिंता करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (टीडी) बचत योजनेचा पर्याय निवडू शकता. पोस्ट ऑफिसच्या टीडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळेल. चला जाणून घेऊया बँकांच्या या व्याजदर कपातीनंतर पोस्टाची ही एफडी कशी ठरू शकते फायद्याची.
तुम्हाला कुठे आणि किती व्याज मिळतंय?
५ वर्षांच्या मुदतीच्या पोस्ट ऑफिस टीडीवर सध्या ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. त्याचबरोबर बँका या कालावधीतील एफडीवर ६.५% ते ७.१% दरानं व्याज देत आहेत. एवढंच नाही तर बँक एफडीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. म्हणजेच बँक बुडल्यास तुमची ५ लाखांपर्यंतची गुंतवणूक सुरक्षित राहील. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसचा टीडी पूर्णपणे सरकारकडून संरक्षित असते. तसेच त्यावर टीडीएस कापला जात नाही, ज्यामुळे तुम्हाला व्याजाचा पूर्ण भरणा मिळतो.
'या' सरकारी स्कीममध्ये मिळू शकते ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम, केवळ 'इतक्या' गुंतवणूकीत होईल काम
कोणासाठी आहे हे बेस्ट?
जर तुमचं सुरक्षित गुंतवणूक आणि फिक्स्ड रिटर्नला प्राधान्य असेल तर पोस्ट ऑफिस टीडी सध्या बँक एफडीपेक्षा चांगली आहे. दुसरीकडे, जर आपल्याला काही लवचिकता आणि सुविधा हवी असेल तर आपण बँक एफडी निवडू शकता. मात्र, येथे तुम्हाला कमी परतावा मिळेल. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसह जास्त परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसचा टीडीचा पर्याय निवडा. पोस्ट ऑफिसच्या टीडीमध्ये तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की टीडी अजूनही मोठ्या प्रमाणात मॅन्युअल प्रक्रिया आहे, परंतु आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून त्यात सुधारणा केली जात आहे.