Air India:टाटा समूहाने एअर इंडिया परत मिळवल्यानंतर कंपनीचा मॅस्कट, म्हणजेच 'महाराजा' बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच सध्या एअर इंडियाच्या सर्व जाहिरातींमधून 'महाराजा' गायब आहे. प्रसिद्ध गीतकार आणि जाहिरात निर्माते एअर इंडियाच्या 'महाराजा'ला नवीन रुप देण्यात व्यस्त आहेत.
'महाराजा'चे 75 वर्षेएअर इंडियाचा 'महाराजा' मॅस्कट 1946 मध्ये तयार करण्यात आला. त्या काळी विमानाने प्रवास करणे ही 'लक्झरी' मानली जायची, त्यामुळेच शाही अंदाजातील महाराजा निवडण्यात आला होता. त्यावेळी एअर इंडियाही टाटा समूहासोबत होती. आता टाटाने कंपनी परत मिळवल्यानंतर हा महाराजा नवीन रुपात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
PM मोदींनी 'महाराजा'ला सामान्य बनवले2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली आणि स्पष्टपणे सांगितले होते की, 'महाराजा' आजच्या जगात चालू शकत नाही. त्यामुळेच 2015 साली 'महाराजा'ला सामान्य माणसाचे रूप देण्यात आले. त्यावर्षी महाराजाची पगडी काढण्यात आली, हेअर स्टाईल बदलली, शेरवानीची जागा जीन्स आणि शर्टने घेतली.
नवा 'महाराजा' असाच असू शकतो'महाराजा' हा एअर इंडियाच्या अस्मितेपासून वेगळा राहू शकत नाही. त्यामुळेच टाटा समूह नवीन 'महाराजा' बनवण्यावर काम करत आहे. हा नवीन महाराजादेखील बारीक, स्पोर्टी, तरुण आणि सध्याच्या एअर इंडियासारखा तरुण असू शकतो. एअर इंडियाचे नवीन सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी फेब्रुवारीमध्येच स्पष्ट केले होते की, एअर इंडियाच्या बदलानंतरही 'महाराजा' एअर इंडियाच्या ब्रँडचा एक भाग राहील.
टाटा समूहाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लंडनस्थित ब्रँड आणि डिझाइन सल्लागार कंपनी 'फ्यूचरब्रँड्स'ची नियुक्ती केली होती. या कंपनीने आपल्या अहवालात म्हटले की, 'महाराजा' आता कालबाह्य झाला असून कंपनीने नवीन मॅस्कटचा विचार करावा. यानंतर एअर इंडियाने नवीन मॅस्कटचे काम प्रसिद्ध गीतकार आणि जाहिरात निर्माते प्रसून जोशी यांच्या मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाकडे सोपवले आहे.