Air India Vistara Employees : टाटा समूहाच्या एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा एअरलाइनचे (Vistara Airline) विलीनीकरण या वर्षीच पूर्ण होणार आहे. या दोन्ही विमान कंपन्यांच्या सीईओंनी सोमवारी एकत्र बैठक घेऊन यासंदर्भातील योजनेला अंतिम रुप दिले. याशिवाय दोन्ही सीईओंनी कर्मचाऱ्यांसोबत प्रदीर्घ टाउनहॉल बैठकही घेतली. यामध्ये या विलीनीकरणाबाबत कर्मचाऱ्यांनाही विश्वासात घेण्यात आले. याशिवाय सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबतही आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्समध्ये मिळून 23,500 कर्मचारी आहेत.
7000 कर्मचाऱ्यांना फिटमेंट अंतर्गत काम दिले जाईल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन आणि विस्तारा एअरलाइन्सचे सीईओ विनोद कन्नन म्हणाले की, विलीनीकरणानंतर आमच्या संसाधनांमध्ये वाढ होईल. तसेच, आम्ही जगातील अनेक मार्गांवर आमच्या सेवा देऊ शकू. सुमारे 7000 कर्मचाऱ्यांना फिटमेंट अंतर्गत विविध नोकऱ्या दिल्या जातील. त्यांचे फिटमेंट जूनअखेर पूर्ण होईल. त्यांच्या भूमिकाही एकाच वेळी ठरवल्या जातील. या कामात पारदर्शकता ठेवण्यासाठी जागतिक सल्लागार कंपनीचीही मदत घेतली जाणार आहे. यामध्ये उद्योग मानकांचीही पूर्ण काळजी घेतली जाईल.
नव्या रचनेत कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही
आगामी योजना डोळ्यांसमोर ठेवून कंपनीची संरचना तयार करण्यात येणार आहे. यात कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दोन्ही प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना दिले. भूमिका ठरवताना पात्रता आणि कार्यक्षमता हा निकष असेल. या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही स्थैर्य मिळणार आहे. विलीनीकरणाबाबत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मनात शंका राहू नये, यासाठी येत्या काळात अनेक टाऊनहॉल बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. हे विलीनीकरण सध्या राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.