Ambuja Cements share: उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटचे शेअर्स (Ambuja Cements share) आज(दि.15) फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्सने आज 0.9% च्या किंचित वाढीसह 615.30 रुपयांच्या इंट्राडे उच्चांक गाठला. या वाढीमागे एक मोठे कारण आहे. ते म्हणजे, अंबुजा सिमेंट्सने तुतीकोरीन, तामिळनाडू येथील माय होम ग्रुपचे सिमेंट ग्रायंडिंग युनिट खरेदी करणार आहे.
कंपनीने काय म्हटले?
अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट्सने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, माय होम ग्रुपचे सिमेंट ग्रायंडिंग युनिट घेण्यासाठी कंपनीने करार केला आहे. युनिटची क्षमता 1.5 एमटीपीए आहे. हा करार रु. 413.75 कोटींमध्ये झाला असून, यामुळे अंबुजा सिमेंटला तामिळनाडू आणि केरळच्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यास मदत होईल. अदानी ग्रुपच्या सिमेंट व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर म्हणाले की, या करारामुळे पायाभूत सुविधा आणि भौगोलिक फायद्यांव्यतिरिक्त अंबुजा सिमेंटला दक्षिणेत मोठे डीलर नेटवर्कदेखील मिळेल. कामावर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी कंपनी विद्यमान कर्मचारी कायम ठेवणार आहे.
शेअर्समध्ये वाढ
गेल्या महिन्याभरात अंबुजा सिमेंटचे शेअर्स 3.99% वाढले आहेत, तर या शेअरने सहा महिन्यांत 40% वर परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च किंमत 640.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची कमी किंमत 373.30 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 1,20,915.87 कोटी आहे.