नवी दिल्ली : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) बँकिंग क्षेत्रात मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने खाजगी क्षेत्रातील RBL बँकेत सुमारे 10 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. महिंद्राचा बँकेत आधीच 3.5 टक्के हिस्सा आहे, जो त्यांनी सेकंडरी मार्केट ट्रांझॅक्शंसमधून विकत घेतला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोत की, आनंद महिंद्रा हे कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) पहिले एंजल इन्व्हेस्टर होते. ते अजूनही याला त्यांची सर्वोत्तम गुंतवणूक मानतात. आज, कोटक महिंद्रा बँकेत महिंद्रा समूहाची कोणतीही भागीदारी नाही, तरीही बँकेने महिंद्राचे नाव कायम ठेवले आहे.
ही गोष्ट 1985 ची आहे. उदय कोटक यांच्या लग्नाचे रिसेप्शन होते. यात आनंद महिंद्रा उपस्थित होते. महिंद्रांनी तेव्हा नुकतंच हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेऊन भारतात परतले होते. महिंद्रा आणि कोटक यांची जुनी ओळख होती. दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने सांगितले की, कोटक यांना फायनान्शिअल कंपनी सुरू करायची होती. तेव्हा महिंद्रांनी त्यात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. कंपनीच्या नावात दोन्ही कुटुंबांची नावे ठेवावीत, असं कोटक यांनी सुचवलं. जगातील कोणत्याही मोठ्या वित्तीय कंपन्यांमध्ये त्यांच्या संस्थापकांची नावे असतात. अशा प्रकारे कोटक महिंद्रा फायनान्सचा जन्म झाला. कंपनीचे पहिले गुंतवणूकदार आनंद महिंद्रा होते. त्यावेळेस त्यांनी कंपनीत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
तिसरी सर्वात मोठी बँक
आज कोटक महिंद्रा बँक ही देशातील तिसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे. कंपनीचे सीईओ आणि एमडी उदय कोटक हे देशातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. अलीकडेच त्यांनी अॅक्टिव्ह कामापासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत. शेअर होल्डर्सना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, त्यांना बँकेत नॉन-एक्झिक्युटिव्ह भूमिका बजावायची आहे. डिसेंबरमध्ये त्यांना या पदावर 15 वर्षे पूर्ण होतील. बँकेची स्थापना NBFC म्हणून झाली. तेव्हापासून उदय कोटक या बँकेचे नेतृत्व करत आहेत. 2003 मध्ये कंपनीला व्यापारी बँकेचा परवाना मिळाला. कोटक सांगतात की, ज्या गुंतवणूकदाराने 1985 मध्ये बँकेत 10,000 रुपये गुंतवले होते, त्यांची किंमत आता 300 कोटी रुपये आहे. म्हणजेच आनंद महिंद्रा बँकेत राहिले असते तर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3,000 कोटी रुपये झाले असते.
आनंद महिंद्रांनी आपल्या कंपनीला पुढे नेले
आनंद महिंद्रांनी आपल्या ग्रुपला मोठ्या उंचीवर नेले. ते 1997 मध्ये महिंद्रा ग्रुपचे एमडी बनले. आज समूहाचा व्यवसाय ऑटो, शेती उपकरणे, वित्तीय सेवा, आयटी, पायाभूत सुविधा विकास सेवा, स्टील ट्रेडिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. त्यांनी देश-विदेशातील अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या आणि अनेक मोठी गुंतवणूक केली. पण महिंद्राचे म्हणणे आहे की, उदय कोटक यांच्या कंपनीत गुंतवणूक करणे, हा त्यांचा सर्वोत्तम निर्णय होता. आता त्यांची कोटक महिंद्रा बँकेत कोणतीही भागीदारी नाही, पण तरीही त्यांचे नाव या बँकेशी जोडले गेले आहे. महिंद्रा ग्रुपमध्ये NBFC महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस आहे.
बँकिंग क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू आहे
महिंद्रा समूह आता औपचारिकरित्या बँकिंग क्षेत्रात उतरणार आहे. पण, समूहाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत RBL बँकेतील त्यांची भागीदारी 9.9 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही. करार पूर्ण झाल्यानंतर, महिंद्रा अँड महिंद्रा गुंतवणूक फंड मॅपलसह बँकेतील सर्वात मोठा भागधारक असेल.