Reliance Power Share Price: उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. हळुहळू करत त्यांनी आपल्यावरील बहुतांश कर्जाची परतफेड केली आहे. दरम्यान, आता दिवाळीनंतर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आली आहे. त्यांच्या रिलायन्स पॉवरची (Reliance Power) उपकंपनी रोजा पॉवर सप्लाय (Rosa Power Supply Company) देखील कर्जमुक्त झाली आहे.
सप्टेंबरमध्ये 833 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम भरलीकंपनीने सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सला 485 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची परतफेड केली आहे. या पेमेंटमुळे रोजा पॉवर सप्लाय कंपनी आता पूर्णपणे कर्जातून बाहेर आली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये कंपनीने वर्दे पार्टनर्सला 833 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले होते. त्यानंतर आता 485 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील पूर्ण कर्ज फेडले आहे.
कंपनी काय करते?रोजा पॉवर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरजवळील रोजा गावात 1,200 मेगावॅटचा कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट चालवते. यासोबतच ही कंपनी आता रिलायन्स पॉवरला ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये व्यवसाय वाढवण्यासही मदत करत आहे.
रिलायन्स पॉवर ही देशातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती आणि कोळसा संसाधन कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स पॉवरकडे कोळसा, वायू, जलविद्युत आणि नवीकरणीय उर्जेवर आधारित ऊर्जा प्रकल्पांचा 5,300 मेगावॅटचा ऑपरेशनल पोर्टफोलिओ आहे. या बातमीनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 43.47 रुपयांवर बंद झाला. यानंतर गुरुवारी सकाळीही स्टॉकमध्ये वाढ होताना दिसत आहे. 44.45 रुपयांवर उघडलेल्या शेअरने 45.63 रुपयांचा उच्चांक गाठला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 17,915 कोटी रुपये झाले आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)