स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या आणि काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला iPhone बनवणारी कंपनी Apple मध्ये नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. Apple लवकरच भारतातील लाखो तरुणांना नोकऱ्या देणार आहे. कंपनीने येत्या 3 वर्षात भारतातील उत्पादनाचा झपाट्याने विस्तार करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे कंपनी आपले कार्यबल 3 पट वाढवणार आहे.
5 लाख लोकांना नोकऱ्या देण्याची योजना
मीडिया रिपोर्टनुसार, Apple आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या पुढील 3 वर्षांत एकूण 5 लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत. यासोबतच, Apple शी संबंधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत 3 पट वाढ होणार आहे. याशिवाय अनेक अप्रत्यक्ष नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. याचे कारण म्हणजे, अॅपल चीनमधून निम्म्याहून अधिक पुरवठा साखळी भारतात हलवत आहे. याशिवाय, त्याच्या उत्पादनात भारतीय पुरवठादारांचा वाटाही वाढवत आहे.
जगातील 7% iPhones भारतात बनतात
सध्या जगात विकल्या जाणाऱ्या ॲपल आयफोनपैकी 7 % आयफोन भारतात तयार होतात. 2030 पर्यंत याची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. सध्या अॅपल उत्पादनांच्या भारतीय पुरवठादारांचे मूल्यवर्धन सुमारे 11-12 टक्के आहे, तर चीनमध्ये हे 28 टक्के आहे. अॅपलला पुढील 3 वर्षांत स्थानिक मूल्यवर्धन 15 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे. मूल्याच्या दृष्टीने पाहिल्यास, भारतातील आयफोनमध्ये स्थानिक मूल्यवर्धन केवळ 14 टक्के आहे, तर चीनमध्ये ते 41 टक्के आहे. ॲपलचे स्थानिक मूल्यवर्धन वाढल्यास भारतातील आयफोनची किंमतही कमी होऊ शकते.