Join us

नवीन मालमत्ता खरेदी करायची आहे? 'या' ५ टिप्स वापरा; ५ ते १० लाख सहज वाचतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 4:59 PM

Property News : तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमचे ५ ते १० लाख रुपये सहज वाचू शकतात.

Property News : भारतीय लोक सर्वाधिक पैसा मालमत्तेत गुंतवतात असे नुकत्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. शेअर मार्केट, बँकेतील ठेवी, सोने, गाड्या यापेक्षाही जास्त गुंतवणूक ही मालमत्ता खरेदी करण्यात खर्च केली जाते. मात्र, मालमत्ता खरेदी करणे वाटते तितके सोपे नाही. घर असो, फ्लॅट असो किंवा प्लॉट, ते विकत घेणे म्हणजे मोठा टास्क असतो. अनेकदा ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. त्यामुळे अशा सौद्यांमध्ये एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हीही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उत्तम नियोजन आणि काळजीपूर्वक निर्णय घ्या. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, जे तुमच्या प्रॉपर्टी खरेदीसाठी खूप उपयोगी ठरतील.

प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी त्या भागातील लोकांना भेटा आणि प्रॉपर्टीच्या सरासरी दरांची माहिती घ्या. त्यानंतर पुन्हा विकासक किंवा दलालाशी चर्चा करा. डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदीच्या काळात घर खरेदीदारांसाठी ऑफर आणि सवलती देत असतात. तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

तुम्हाला आर्थिक भार टाळायचा असेल तर तुमच्या बजेटनुसार घर घ्या. घर खरेदीसाठी बजेट ठरवा. तुम्हाला किती मोठे घर किंवा कोणत्या आकाराचा फ्लॅट हवा आहे तेही ठरवा. लक्षात ठेवा आपल्या निर्णयावर ठाम राहा. ज्यांनी यापूर्वी घरे खरेदी केली आहेत, अशा मित्रांशी किंवा शेजाऱ्यांशी चर्चा करा. ते तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची माहिती देऊ शकतात. यानंतर थेट घरमालकाशी संपर्क साधा.

मालक आणि खरेदीदार यांच्यात थेट व्यवहार झाला तर कमिशनची मोठी रक्कम वाचेल. त्यामुळे थेट विकासक किंवा विक्रेत्यांकडून घर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्ही किंमतीवर ५ टक्क्यांपर्यंत बचत करू शकता. तुम्ही गृहनिर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी करत असाल, तर विकासकाने कायदेशीररीत्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत याची खात्री करा.

शक्य तितके रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळण्यास मदत होईल. कारण विकासक एकरकमी पैसे देऊन कमी किमतीत घरे विकतात. 

तयार घरे बांधकामाधीन घरांपेक्षा अधिक महाग असतात. तुम्ही बांधकामाधीन घरांसाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता. एकाच प्रकल्पात २-४ ग्राहकांनी एका गटात घर विकत घेतल्यास, विकासक अतिरिक्त सवलत देऊ शकतो.

टॅग्स :गुंतवणूकसुंदर गृहनियोजनपैसा