BharatPe Case: फिनटेक कंपनी भारत-पे (BharatPe) चे संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आणि त्यांची पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर (Madhuri Jain Grover) कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. या दोघांवर फिनटेक कंपनी भारतपेसोबत सुमारे 81 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अशातच आता दिल्ली हायकोर्टाने अश्नीर आणि माधुरीला परदेशात जाण्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे.
न्यायालयाने या दाम्पत्याला आदेश दिला आहे की, त्यांना अमेरिकेत जायचे असेल, तर 80 कोटी रुपयांची सुरक्षा/गॅरंटी जमा करावी लागेल. तसेच, परदेशात जाण्यापूर्वी अमिराती कार्डदेखील जमा करावे लागेल, जेणेकरुन ते संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये जाऊ शकणार नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने अश्नीरच्या प्रवासाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) माहिती मागवली होती. अश्नीरला त्याच्या मुलांच्या समर स्कूलसाठी अमेरिकेला जायचे आहे. पण, जाण्यापूर्वी त्याला त्याचे राहण्याचे ठिकाण, हॉटेल, प्रवास योजना आणि फोन नंबर द्यावा लागेल, असे न्यायालयाने त्याला सांगितले होते. ही सर्व माहिती तपास यंत्रणांनादेखील द्यावी लागणार आहे.
अश्नीर आणि माधुरी वेगवेगळे जाणार अश्नीर ग्रोव्हर 26 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे, तर 14 जून रोजी भारतात परतणार आहे. यानंतर त्याची पत्नी माधुरी जैन 15 जून रोजी अमेरिकेला जाणार असून, 1 जुलै रोजी भारतात परतणार आहे. दरम्यान, यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना परदेशात जाऊ देऊ नये, असे निर्देश दिले होते. अश्नीर आणि त्याच्या पत्नीचीही परदेशात मालमत्ता आहे. ते तिकडे गेले, तर परत येणार नाहीत, अशी भीती एजन्सीला आहे. या दोघांवर फिनटेक कंपनी भारतपेसोबत सुमारे 81 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
अश्नीरकडे 900 कोटींची संपत्ती भारतपे सोडल्यानंतर अश्नीर ग्रोव्हरने जवळपास 51 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 900 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.