केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम अटल पेन्शन योजना (APY) अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे. या योजनेत पैसे जमा केल्यावर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. एकूणच, या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता करावी लागणार नाही. केंद्र सरकारने मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती. यापूर्वी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अटल पेन्शन योजनेसारखी कोणतीही योजना नव्हती. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये नोंदणी करू शकतो. जाणून घेऊया स्कीममधील महत्त्वाच्या बाबी.
1 ऑक्टोबर 2022 पासून टॅक्सपेअर्सना या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. 18 ते 40 या वयोगटातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाचं बँकेत सेव्हिंग अकाऊंट किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट असणं अनिवार्य आहे. या अटींची पूर्तता करणारी कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी बँकेच्या शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधू शकते. याची प्रक्रिया ऑनलाइन देखील करता येते. यासाठी व्यक्तीला PRAN कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे, जे NPS अंतर्गत रजिस्ट्रेशन आहे आणि त्यासाठी APY नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
या योजनेअंतर्गत अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला, तिमाहित किंवा सहा महिन्यांमध्ये ठराविक रक्कम भरल्यानंतर रिटायरमेंटनंतर 1 हजार 5 हजार रुपयांपर्यंतचं पेन्शन मिळतं. जर तुम्ही प्रत्येक सहा महिन्यांमध्ये केवळ 1239 रुपये गुंतवल्यास 60 व्या वर्षानंतर कायम 5 हजार रूपये महिना म्हणजेच 60 हजार रुपये वार्षिक पेन्शनची गॅरंटी देते. सद्य नियमानुसार 18 व्या वर्षी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला 5 हजारांचं पेन्शन हवं असेल तर तुम्हाला महिन्याला 210 रुपये द्यावे लागतील.
जर हीच रक्कम तुम्ही दर तीन महिन्यांनी दिली तर 626 रुपये आणि सह महिन्यांनी दिल्यास 1239 रुपये द्यावे लागतील. महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, जर तुम्ही 18 वर्षी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मासिक 42 रुपये द्यावे लागतील. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्सच्या कलम 80CCD अंतर्गत सूटही मिळणार आहे.