बँक ऑफ बडोदाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) लाँच केले आहे. ही सरकारी योजना महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियानंतर बँक ऑफ बडोदा ही योजना लाँच करणारी देशातील तिसरी बँक ठरली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये महिला आणि मुलींसाठी अल्प बचत योजनेअंतर्गत महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा केली होती. याची सुरुवात एप्रिल २०२३ पासून करण्यात आली. या बचत योजनेचं खातं फक्त पोस्ट ऑफिसमध्येच उघडलं जात होतं. मात्र नियमात दुरुस्ती केल्यानंतर आता बँकेतही हे खातं उघडता येऊ शकतंय.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात (MSSC) दोन वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. यामध्ये, वार्षिक आधारावर, सरकार महिला गुंतवणूकदाराला ७.५ टक्के दरानं व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.
कोण सुरू करू शकतं खातं?
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना आणि बँकेचे ग्राहक नसलेल्या महिलांनाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खाते उघडण्याची परवानगी देते. यामध्ये महिला स्वतःच्या वतीने किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीनं खातं उघडू शकतात.
काय आहे नियम?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं. गंभीर आजार वगैरे असल्यास खातं वेळेपूर्वी बंद करण्याची सुविधा आहे. खाते लवकर बंद झाल्यास, योजनेच्या ७.५ टक्के मानक दरानं मूळ रकमेवर व्याज देय असेल.
किती आकारतात दंड?
महिला सन्मान बचत योजनेचे खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर, ग्राहक २ टक्के दंड भरून खातं बंद करण्याची विनंती करू शकतात. अशा परिस्थितीत, मूळ रकमेवर ५.५ टक्के व्याज दिलं जाईल. त्याच वेळी, MSSC योजनेच्या खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, खातेधारक पात्र शिल्लक रकमेच्या ४० टक्क्यांपर्यंत अंशतः पैसे काढू शकतात.