Property Tips : कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो. कारण, यासाठी प्रत्येकजण आयुष्यभराची जमापुंजी लावणार असतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. सामान्यतः रिअल इस्टेट मार्केटमध्ये २ प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध असतात, बांधकामाधीन आणि लगेच ताबा मिळणारी. खरेदीदार त्यांच्या गरजेनुसार अंडर-कन्स्ट्रक्शन आणि रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी खरेदी करतात. रेडी-टू-मूव्ह मालमत्तेचे काही फायदे आहेत. कारण फक्त पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह अशा मालमत्तेमध्ये शिफ्ट होऊ शकता. पण रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी खरेदी करताना ४ अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
मालकी हक्क
तुम्ही एखादी रेडी-टू-मूव्ह मालमत्ता खरेदी करणार असाल, तर आधी त्याच्या खऱ्या मालकाची ठोस माहिती मिळवा. यासाठी तुम्ही त्या मालमत्तेची कागदपत्रे घेऊन महसूल कार्यालयातून मालकाची खातरजमा करावी. अनेक प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे देऊन मालमत्ता विकल्याची प्रकरणे घडली आहेत.
मालमत्तेचा कालावधी
तुम्ही खरेदी करणार असलेल्या मालमत्तेचे नेमके वय जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आजच्या काळात कोणत्याही मालमत्तेचे कमाल वय ७० ते ८० वर्षे मानले जाते. तुमची मालमत्ता जितकी जुनी असेल तितकी तिची किंमत नवीन मालमत्तेच्या तुलनेत कमी होते. मालमत्तेचे नेमके वय जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या भागातील स्थानिक लोक आणि प्रॉपर्टी डीलर्सशी बोलू शकता. याशिवाय तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरचीही मदत घेऊ शकता.
सुविधा
कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तेथे कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करा. घरामध्ये वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्थेसोबत आजूबाजूच्या परिसराचीही माहिती असावी. तुम्ही ज्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करत आहात त्या ठिकाणी रस्ते कसे आहेत, सार्वजनिक वाहतुकीची स्थिती काय आहे, शाळा आणि रुग्णालये किती दूर आहेत, जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाइन डिलिव्हरी आहे की नाही याची ठोस माहिती असणे आवश्यक आहे.
आरडब्लूए
रिअल इस्टेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजच्या काळात रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन (RWA) खूप महत्त्वाची ठरत आहे. कोणत्याही शहरात स्थलांतरित होणाऱ्या नवीन लोकांसाठी सुरक्षा ही मोठी समस्या आहे. साधारणपणे आरडब्ल्यूए एखाद्या सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात. स्वत: च्या वतीने सुरक्षा प्रदान करतात. याशिवाय अनेक ठिकाणी वीज आणि प्लंबिंगसारख्या कामांची जबाबदारीही आरडब्ल्यूए घेतात.