ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) वृद्धांमध्ये बचत करण्यासाठी सर्वात लोकप्रिय स्कीम आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यात ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकते. ३० लाख रुपयांच्या मर्यादेत एकापेक्षा अधिक खाती उघडणं शक्य आहे का याबद्दल आपण जाणून घेऊ.कोण करू शकतं गुंतवणूक?६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या परंतु ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या सेवानिवृत्त व्यक्तींनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्याच्या एका महिन्याच्या आत गुंतवणूक केल्यास ते देखील या योजनेची निवड करू शकतात. या योजनेचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, परंतु मॅच्युरिटी झाल्यावर तो तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.एकापेक्षा अधिक खाती उघडता येतात का?स्टेट बँक ऑफ इंडियानं SCSS वरील FAQ मध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. एक ठेवीदार काही नियम आणि नियमांच्या अधीन एकापेक्षा जास्त खाती ऑपरेट करू शकतो. तुम्हाला बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये एका पेक्षा अधिक खाती उघडण्याची आणि ऑपरेट करण्याची परवानगी आहे. यासंदर्भात BankBazaar.com चे पंकज बन्सल म्हणाले की या योजनेत एकापेक्षा अधिक खाती उघडण्याची परवानगी आहे. परंतु गुंतवणूकीचं एकत्रित मूल्य गुंतवणूकीच्या मर्यादेपेक्षा जास्त असू शकत नाही.जरी एक ज्येष्ठ नागरिकानं बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा अधिक SCSS खाती उघडली, तरी या सर्व SCSS खात्यांची एकूण मर्यादा ३० लाख रुपये किंवा सेवानिवृत्ती लाभ म्हणून मिळालेली रक्कम, यापैकी जी कमी असेल ती असेल. दरम्यान, लक्षात ठेवण्याजोगी बाब म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर, व्याज दर योजनेच्या कालावधीसाठी म्हणजेच 5 वर्षांसाठी निश्चित राहतो. व्याज प्रत्येक तिमाहीत दिलं जातं आणि ते पूर्णपणे करपात्र आहे. ही योजना मॅच्युरिटीवर कोणतंही व्याज देत नाही.
फायद्याची आहे सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, पण तुम्ही एकापेक्षा अधिक अकाऊंट सुरू करू शकता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 11:25 AM