Billionaires in India: विकसनशील देश असूनही भारत अब्जाधीशांच बाबतीत अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी स्पर्धा करत आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2024 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 185 वर पोहोचली आहे. सध्या अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या 835 तर चीनमध्ये 427 आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
गेल्या एका वर्षात 21 टक्क्यांच्या वाढीसह भारतातील अब्जाधीशांच्या यादीत 32 नवीन अब्जाधीश जोडले गेले आहेत. तर 2015 पासून हा आकडा 123 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 42.1 टक्क्यांनी वाढून 905.6 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षभरात अमेरिकेत अब्जाधीशांच्या यादीत 84 नवीन लोकांचा समावेश झाला आहे, तर चीनमध्ये 93 जणांचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील अब्जाधीशांची एकूण संपत्ती $4.6 ट्रिलियन वरून $5.8 ट्रिलियन झाली आहे, तर चीनमधील अब्जाधीशांची एकूण संपत्ती $1.8 ट्रिलियन वरुन $1.4 ट्रिलियन झाली आहे. 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची संख्याही वाढली आहे. 2015 मध्ये हा आकडा 1,757 होता, जो या वर्षी 2,682 वर पोहोचला आहे. त्यांची एकूण संपत्ती $6.3 ट्रिलियन वरून $14 ट्रिलियन झाली आहे.
भारताची संख्या वाढणार
अहवालानुसार, 2015 ते 2020 पर्यंत जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या संपत्तीत वार्षिक 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 2020 पासून ती 1 टक्क्यांवर स्थिर आहे. मात्र, त्यात अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशियातील काही भागांचा डेटा समाविष्ट केलेला नाही. या वर्षी 2,682 अब्जाधीशांपैकी 1,877 स्वतःहून या पदावर पोहोचले आहेत, तर 805 अब्जाधीशांना वारशाने संपत्ती मिळाली आहे. पुढील दशकात भारतातील अब्जाधीश उद्योजकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.