Join us

कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:00 PM

BPCL Privatization Refuse: केंद्र सरकारने 2022 मध्ये या कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, पण गेल्या दोन वर्षातील कमाई पाहून सरकारने आपला निर्णय बदलला आहे.

BPCL Privatization Refuse: इंडियन ऑइलनंतर BPCL भारतातील दुसरी सर्वात मोठी तेल कंपनी आहे. FY 22 मध्ये NDA सरकारच्या खासगीकरण कार्यक्रमात एअर इंडियासह BPCL चेही नाव होते. पण, आता मोदी सरकार 3.0 मध्ये सरकारची रणनीती थोडी बदललेली दिसते. देशाचे नवनिर्वाचित पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या बीपीसीएलच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत प्रश्नाला उत्तर देताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, सरकार PSU तेल कंपन्यांच्या खासगीकरणाच्या बाजूने नाही. मग बीपीसीएलसारख्या यशस्वी महारत्न कंपनीचे खासगीकरण का करेल? याउलट ग्रीन हायड्रोजन, रिफायनरी, इथेनॉल आदींवर भर दिला जाईल. सध्या सरकारला तेल आणि वायू उद्योगातून 19-20 टक्के महसूल मिळतो. त्यामुळे आता बीपीसीएलच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. उलट उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे. लवकरच तेलाचे उत्पादन 45,000 बॅरल प्रतिदिन केले जाईल.

हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले की, जेव्हा क्रूडची किंमत प्रति बॅरल 75-80 डॉलरच्या जवळपास पोहोचेल तेव्हाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बीपीसीएल ग्रीनफिल्ड रिफायनिंगच्या तयारीच्या प्रगत टप्प्यात आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पण, सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे अवघड आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बीपीसीएलचा नफाबीपीसीएलने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा कमावला आहे. तर, बीपीसीएलने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत 4,789.57 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 30% कमी आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 6,870.47 कोटी रुपये होता.

सरकार सर्व हिस्सा विकणार होतेFY 22 मध्ये NDA सरकारच्या खासगीकरण कार्यक्रमात एअर इंडियासह BPCL चे खाजगीकरण समाविष्ट करण्यात आले होते. केंद्राने BPCL मधील आपला संपूर्ण 52.98% हिस्सा विकण्याची योजना आखली होती, ज्यातून आर्थिक वर्ष 2022 मध्ये अंदाजे 45,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. एवढेच नाही तर सरकारने मार्च 2020 मध्ये यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) किंवा प्रारंभिक बोली आमंत्रित केल्या होत्या. मार्च 2021 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना होती. पण कोविडमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

शेअरची स्थितीBPCL शेअर्स NSE वर 5.95 अंकांनी किंवा 0.99 टक्क्यांनी वाढून 607 रुपयांवर बंद झाले. आज या शेअरचा उच्चांक 612.70 रुपये होता. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 132,259 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बीपीसीएलच्या शेअर्समध्ये एका आठवड्यात 5.14 टक्क्यांनी वाढ झाली, तर गेल्या एका महिन्यात 1.40 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. मात्र, या वर्षी आतापर्यंत स्टॉकने 35.32 टक्के परतावा दिला आहे. 

 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकनरेंद्र मोदीकेंद्र सरकारपेट्रोलडिझेल