सामान्यांसाठी पोस्ट ऑफिस, बँकांमध्ये पैसे ठेवणे हे सुरक्षित मानले जाते. आय़ुष्यभराची कमाई असते, त्यावर पुढील खर्च भागवायचे असतात. यासाठी एफडीमध्ये पैसे गुंतविले जातात. परंतू, त्यावर मनासारखे व्याज मिळत नाही. आरबीआयने व्याजदर वाढविलेले असले तरी त्याचा म्हणावा तसा फायदा व्याजावर होत नाही. जर तुम्हाला जास्त व्याज हवे असेल तर तुम्हाला आणखी एक पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळवू शकता.
देशातील सर्वात मोठी एनबीएफसी रिटेल चेनमध्ये मोडणाऱ्या श्रीराम फाइनान्स लिमिटेडने ज्युबली डिपॉझिटनुसार स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम सुरु केली आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिकांना देखील गुंतवणूक करता येणार आहे.
श्रीराम फायनान्स महिलांना ०.१० टक्के अतिरिक्त व्याज देते. तर वरिष्ठ नागरिकांना ०.५० टक्के आणि वरिष्ठ महिलांना ०.६० टक्के अधिकचे व्याज मिळत आहे. या नव्या व्याज दराचा फायदा ५० महिन्यांच्या नवीन आणि रिन्यू करण्यात येणाऱ्या एफडीवर मिळणार आहे.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कंपनी सामान्य नागरिकांसाठी साडे आठ टक्क्यांचे व्याज देते. महिला असेल तर त्यात ०.११ टक्क्यांची वाढ केली आहे. जर एखादा ग्राहक त्याची एफडी रिन्यू करत असेल तर त्याला ८.७७ टक्के व्याजदर मिळेल. महिलांसाठी या अटीवर ८.८८ टक्के व्याजर दिला जाईल.
वरिष्ठ नागरिकांना ५० महिन्यांच्या डिपॉझिटवर ९.०४ टक्के व्याजदर मिळेल. तर वरिष्ठ महिलांना ९.१५ टक्के व्याजदर मिळेल. जर या नागरिकांचे श्रीराम फायनान्समध्ये आधीच पैसे गुंतविलेले असतील आणि त्यांनी त्यांची एफडी रिन्यू केली तर वरिष्ठ पुरुष ग्राहकांना 9.31 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. तर महिला सिनिअर सिटिझनला 9.42 टक्के व्याज दिले जाणार आहे.