Business Idea: गेल्या अनेक दशकांपासून गुंतवणुकीसाठी देशवासीयांचा सर्वाधिक विश्वास असलेले नाव म्हणजे भारतीय टपाल विभाग म्हणजेच Post Office. पोस्ट ऑफिसच्या अनेकविध प्रकारच्या योजनांमध्ये देशातील कोट्यवधी नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. यातच आता एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर कमाई करण्याची एक उत्तम योजना पोस्ट ऑफिसने आणल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय टपाल विभागाने तुमच्यासाठी कमाईची संधी उपलब्ध करुन दिली आहे. पोस्ट खात्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून कमाई करण्याची ही योजना आहे. त्यासाठी केवळ ५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कमाई करता येणे शक्य होईल, असे म्हटले जात आहे.
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी अन् दर महिना कमाई करा
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी घेऊन तुम्हाला व्यवसाय करता येईल. या व्यवसायासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन तुम्हाला योजनेत सहभागी होता येईल. इंडिया पोस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पोस्ट कार्यालयांचा विस्तार होणार आहे. देशात १० हजार नवीन पोस्ट कार्यालये सुरु करण्याची योजना आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर पोस्ट खात्याच्या मार्फत बँकिंग सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. तुम्ही पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेऊन त्यामाध्यमातून कमाई करु शकता, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणाला घेता येणार फ्रेंचायझी?
फ्रेंचायझी घेऊन पोस्ट खात्याच्या अनेक योजना आणि बँकिंग सेवा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात या सेवा पुरविण्यासाठी पोस्ट खात्याकडून फ्रेंचायझी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत घर बसल्या पोस्ट कार्यालय सुरु करता येऊ शकते. त्यामाध्यमातून चांगली कमाई करता येऊ शकते. या फ्रँचायझीसाठी तुम्हाला पोस्ट खात्याकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर पुढील १५ दिवसांत पुढील कार्यवाही होईल. कमीशन आधारावर तुम्हाला या योजनेतून कमाई करता येईल. इयत्ता ८वी उत्तीर्ण, वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या योजनेत सहभागी होता येईल. तुम्हाला संगणकीय ज्ञान असणे ही आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"