आजकाल बहुतांश लोकांची निरनिराळ्या बँकांमध्ये खाती असतात. या खात्यांद्वारे, लोक फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त एफडी किंवा आरडी सुरू करू शकता. पण पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याबाबतही तुम्ही असंच करू शकता का? एफडी किंवा आरडी प्रमाणे, पीपीएफ ही एक अशी योजना आहे, जी भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
या योजनेत तुम्ही वार्षिक 500 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. चक्रवाढ व्याजाचा लाभ पीपीएफमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे दीर्घकाळात चांगली रक्कम जमा होऊ शकते. या कारणास्तव अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवतात. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के दरानं व्याज मिळत आहे. परंतु आता असा प्रश्न असा येतो की एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक पीपीएफ खाती उघडू शकते का?
काय आहे नियम?
नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर एकच पीपीएफ खातं उघडू शकते. एकापेक्षा अधिक पीपीएफ खातं उघडण्यासाठी परवानगी नाही. जर तुम्ही चुकून एकापेक्षा अधिक पीपीएफ खाती उघडली असतील, तर तुम्ही ते मर्ज करू शकता. यासाठी पीपीएफ खातेधारकाला खातं मर्ज करण्याची विनंती करावी लागेल. बँक किंवा पोस्ट ऑफिस ज्या ठिकाणी तुम्हाला पीपीएफ खातं ठेवायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही विनंती करावी लागेल. मर्जर रिक्वेस्ट, पीपीएफ पासबुक, खात्याच्या तपशिलांच्या फोटोकॉपीसह सादर करावं लागेल. रिटेन अकाऊंट उघडण्याची तारीख ही PPF खातं उघडण्याची वास्तविक तारीख मानली जाईल.
कोण उघडू शकतं खातं?
कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. मुलांच्या नावानं खातं उघडता येतं. पालकांपैकी कोणीही अल्पवयीन मुलासाठी किंवा मुलीसाठी पीपीएफ खातं उघडू शकतो. दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास, आजी-आजोबा नातवंडांचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकतात.