Tata IPO: टाटा टेक्नॉलॉजीजच्या यशस्वी आयपीओनंतर टाटा ग्रुपच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच येऊ शकतो. द हिंदू बिझनेस लाइनच्या रिपोर्टनुसार, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचा (Tata Passenger Electric Mobility Limited) आयपीओ येण्याची शक्यता आहे. ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. Nexon EV आणि Tiago EV मॉडेल्सच्या मागे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड असल्याचं म्हटलं जातंय.
केव्हा येऊ शकतो आयपीओ?
कंपनीचा आयपीओ पुढील १२ ते १८ महिन्यांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी पब्लिक इश्यूद्वारे १ ते २ बिलियन डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करेल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की टाटा समूह येत्या काही वर्षांत ईव्ही क्षेत्रात अतिशय आक्रमकपणे वाढ करण्याचा विचारात आहे.
१ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणूकीची योजना
कंपनीचा IPO कधी येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, कंपनी आर्थिक वर्ष २०२५ किंवा २०२६ मध्ये आयपीओ लॉन्च करू शकते. सध्याची परिस्थिती इलेक्ट्रिक स्टॉक्ससाठी अनुकूल आहे. टाटा मोटर्स टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडमध्ये १ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करू शकते.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (Tata Passenger Electric Mobility Limited) बद्दलची चर्चा पहिल्यांदा सुरू झाली जेव्हा कंपनीने टीपीजीकडून जानेवारी २०२३ मध्ये १ बिलियन डॉलर्सचा निधी उभारला. अशा परिस्थितीत जर कंपनीचा आयपीओ आला तर कंपनीला आपल्या योजना वेगानं पुढे नेण्यासाठी चांगला निधी मिळू शकतो. टाटा मोटर्सच्या एका शेअरची किंमत सोमवारी 940.30 रुपयांच्या आसपास होती.
(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)