Children Investment Schemes: मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक वेगवेगळ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवत असतात. पालकांकडून चिल्ड्रेन फंडामध्ये केल्या जात असलेल्या गुंतवणुकीत मागील काही वर्षात वेगानं वाढ झाली आहे. या फंडातील एकूण व्यवस्थापनाधीन रक्कम (एयूएम) मे २०२४ मध्ये २०,०८१ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
मागील पाच वर्षात यात तब्बल १४२ टक्के वाढ झाली. अधिक परतावा देत असल्याने त्यांचा चिल्ड्रेन फंडातील गुंतवणुकीकडे ओढा अधिक वाढलाय, असे गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरए अॅनालिटिक्सने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. मुदत ठेवींच्या तुलनेत चिल्ड्रेन फंडाने दिलेला परतावा कितीतरी पट अधिक आहे.
मे २०१९ मध्ये फंडातील एकूण रक्कम ८,२८५ कोटी इतकी होती. वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून ही रक्कम मे २०२३ मध्ये १५,३७५ कोटींच्या घरात पोहोचली होती. २९.९३ लाख इतके पोलिओ मे २०२४ पर्यंत होते. इतकंच नाही तर पोर्टफोलिओची संख्या ४ टक्क्यांनी वाढली. मे २०१९ मध्ये फोलियोंची संख्या २८.८३ लाख इतकी होती.
का अधिक फायद्याचे?
- या फंडांमध्ये ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाचा लॉक इन पिरीएड असतो. पैसे टाकताना पालकांना शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते. ही बचत ठरवून बाजूला काढली जात असते. लॉक इन पिरीएडमुळे पैसे मध्येच काढणे शक्य नसते.
- हेच पैसे पुढे इक्विटी तसेच डेट फंडात गुंतविले जात असतात. वैविध्यामुळे यात जोखीम कमी असते. त्यामुळे मिळणाऱ्या परताव्याचे प्रमाण अधिक असते.
- मूल मोठे झाल्यानंतर ही रक्कम शिक्षण तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी उपयोगी ठरते.
प्रमुख फंडाचा वाटा किती?
एचडीएफसी चिल्ड्रेन गिफ्ट ९,०१८ ५२%
यूटीआय हायब्रीड चिल्ड्रेन ४,४३३ २५%
एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट २,०२३ १२%
(एयूएम कोटी रुपयांमध्ये)
शिक्षणाच्या महागाईतील वाढ अंदाजे ११ ते १२ टक्के आहे. अशा स्थितीत पालकांना मुलांचे शिक्षणासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी लागणार आहे. चांगल्या परताव्यामुळे चिल्ड्रेन फंडाबाबत आकर्षण वाढले आहे. अश्विनी कुमार, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मार्केट डेटा विभाग, आयसीआरए ॲनालिटिक्स