Join us

Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 10:54 AM

Children's Day 2024: महागाईचा विचार करता मुलांच्या भविष्यासाठी अधिक पैशांची गरज भासणार आहे. आज बालदिनानिमित्त मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता.

Children's Day 2024: देशाचं भविष्य लहान मुलांच्या हातात असतं, असं म्हणतात. त्यांच्यावर योग्य संस्कार, शिक्षण केलं तर देशाचीही प्रगती होण्यास विलंब होणार नाही. आज बालदिवस आहे. या दिवशी आपल्या मुलांचे फोटो फक्त स्टेटसला ठेऊन उपयोग नाही. तर भविष्यात पैशाअभावी आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण आणि करिअरच्या संधी गमावू नयेत, यासाठी आजपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत मुलांचे उज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून योग्य गुंतवणूक सुरू करण्याची गरज आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी उपयुक्त ठरू शकतात.

युनिट-लिंक्ड विमा योजनातुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी युलिप हा एक लोकप्रिय पर्याय आहे. हे गुंतवणुकीसह आयुर्विमा संरक्षणाचे फायदे एकत्र देते. आयुर्विम्याचे दुहेरी लाभ तसेच बाजाराशी संबंधित परतावा यातून मिळतो. मार्केट लिंक्ड रिटर्नचा फायदा घेताना तुम्ही तुमच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकता.

आयुर्विमातुमच्या मुलाच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी बचत करण्यासोबत विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आयुर्विमा योजनांचा विचार करू शकता. कठीण परिस्थितीत आर्थिक सुरक्षा देण्यासोबत आयुर्विमा हे गुंतवणुकीचा एक चांगले साधन ठरू शकते. एंडॉवमेंट प्लॅन्स सारख्या धोरणांमुळे अनपेक्षित घटना घडल्यास आर्थिक संरक्षण मिळते. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीची शिस्त लागण्याचा मोठा फायदा होतो.

म्युच्युअल फंडात एसआयपीजर तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम वाचवू शकत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी (म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर मार्ग) करू शकता. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी एकरकमी रक्कम नसेल तर एसआयपी हा पर्याय बेस्ट आहे. या योजनेत दीर्घकाळात उच्च परतावा मिळू शकतो.

एफडी किंवा आरडीजर तुम्ही पारंपारिक गुंतवणूकदार असाल आणि जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एफडी किंवा आरडी स्कीममध्ये पैसे गुंतवणे सुरू करू शकता. FD किंवा RD मध्ये निश्चित व्याज दर असून गुंतवणुकीची सुरक्षा सर्वाधिक असते. बाजाराशी निगडित योजनांसारखा यात मोठा परतावा नसतो. मात्र, जोखीम-प्रतिरोधक गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय आहे.

सुकन्या समृद्धी योजनातुम्हाला मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी योजनेसारखा सुरक्षित आणि चांगला दुसरा पर्याय नाही. यामध्ये १० वर्षांपर्यंत असलेल्या मुलींच्या नावे गुंतवणूक करता येते. तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत कर सूट देखील घेऊ शकता. ही दीर्घकालीन गुंतवणूक मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते.

सोनेसोने हा भारतातील पारंपारिक गुंतवणुकीचा पर्याय आहे. अनेक नातेवाईक नवजात बालकांना सोन्याची नाणी, दागिने भेट देतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोने खरेदी करून तुमच्या मुलांच्या नावावर ठेवू शकता. गेल्या काही वर्षात सोन्याने शेअर बाजाराइतका मोठा परतावा दिला आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमुलांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन निधी तयार करण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा देखील एक चांगला पर्याय आहे. ही एक सरकारी-समर्थित बचत योजना असून आकर्षक कर लाभ देते. १५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसोबत PPF शिस्तबद्ध बचतीला प्रोत्साहन देते.

रिअल इस्टेटरिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ताच मुलांच्या नावे मालमत्ता खरेदी केली तर त्याच्या भाववाढीचा चांगला फायदा मुलांना भविष्यात होऊ शकतो.

टॅग्स :बालदिनगुंतवणूकपीपीएफशेअर बाजार