Join us  

सेमीकंडक्टरचा तुटवडा; चीनची 'या' धातूंच्या निर्यातीवर बंदी, भारतावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 5:39 PM

चीनच्या निर्णयामुळे भारतासह जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे.

सेमीकंडक्टरच्या (semiconductors) उत्पादनात चीनचे (China) वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिका आणि भारताने (India-America) हातमिळवणी केली आहे. अमेरिका लवकरच भारतात सेमीकंडक्टरचा प्लाँट उभारणार आहे. पण, यादरम्यान चीनने रडीडाव खेळायला सुरुवात केली आहे. सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे गॅलियम आणि जर्मेनियमच्या निर्यातीवर चीनने निर्बंध घातले आहेत. 

चीन हा दुर्मिळ खनिजांचा मोठा उत्पादक देश आहे, त्यामुळे जागतिक बाजारपेठेला धक्का बसणार आहे. पाश्चिमात्य देशांना धडा शिकवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे. पण याचा भारतातील चिप उत्पादनावरही मोठा परिणाम पडणार आहे. सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी भारत एक प्रमुख जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. देशातील वेगाने वाढणाऱ्या दूरसंचार आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

काय आहेत हे धातू?गॅलियम आणि जर्मेनियम (gallium germanium) हे नैसर्गिकरित्या तयार होणारे धातू आहेत. परंतु हा धातून इतर धातूंच्या प्रक्रियेतूनही तयार केला जाऊ शकतो. गॅलियम हे बॉक्साईट आणि जस्त धातूंवर प्रक्रिया करुन तयार केले जाऊ शकते. माहिती याचा वापर सेमीकंडक्टर, सर्किट आणि एलईडी लाईट बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, स्पेशलाइज्ड थर्मामीटर, बॅरोमेट्रिक सेन्सर्स, सोलर पॅनेल्स, ब्ल्यू-रे तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल्समध्येही याचा वापर होतो.

जर्मेनियम हे सामान्यतः जस्त आणि सल्फाइड धातूपासून तयार होते. वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये कोळसा जाळून तयार होणाऱ्या राखेमध्येही जर्मेनियमचे मोठे प्रमाण आढळते. याचा वापरदेखील माहिती आणि दूरसंचार क्षेत्रासह तंत्रज्ञानाशी निगडीत वस्तूंमध्ये केला जातो. यातून ऑप्टिकल फायबर, उपग्रह, सौर पेशी, कॅमेरा, मायक्रोस्कोप लेन्स, इन्फ्रारेड नाईट व्हिजन सिस्टम इत्यादींमध्ये वापरले जाते.

सध्या भारतात या खनिजांची मागणी कमी असली तरी येणाऱ्या काळात भारत प्रमुख सेमीकंडक्टर उत्पादक देश बनणार आहे. त्यामुळे भविष्यात या खनिजांना प्रचंड मागणी असेल. Deloitte च्या मते, 2030 पर्यंत जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाचा महसूल $1 ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकतो.

टॅग्स :चीनभारतअमेरिकाव्यवसायतंत्रज्ञान