Closing Bell Today: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजाराचे एकूण मार्केट कॅप ५ लाख कोटी डॉलर्सवर पोहोचलं आहे. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ५२ अंकांनी घसरून ७३९५३ वर बंद झाला, तर निफ्टी ७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२५०९ वर बंद झाला.गेल्या ६ महिन्यांत शेअर बाजारानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १ ट्रिलियन डॉलरची वाढ केली आहे. शेअर बाजारानं मंगळवारी प्रथमच ५ ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश केला. परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीदरम्यान देशातील गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यानं शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारातील सर्व लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४१४.७५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं होतं. या दोन्ही शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदार जोरदार खरेदी करत आहेत. यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर बाजाराचं मार्केट कॅप ४ लाख कोटी डॉलरच्या पुढे गेलं होतं.
कोण आहेत टॉप गेनर / लूझर
चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. दिवसभर शेअर बाजार कधी रेड झोन तर कधी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होता. हिंडाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, अदानी पोर्ट्स, सिप्ला आणि पॉवर ग्रिड यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी लाइफचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी
मंगळवारी गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले. अदानी पॉवर ७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर एसीसी लिमिटेड किरकोळ वाढीसह बंद झाला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मतदान झाल्याने सोमवारी शेअर बाजार बंद होता.