Join us

मुलांच्या उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंतची चिंता आहे? असं करा प्लॅनिंग, भासणार नाही पैशांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 1:19 PM

महागाईच्या या काळात पगार कधी खर्च होतो ते कळत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याची चिंता असते.

महागाईच्या या काळात पगार कधी खर्च होतो ते कळत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याची चिंता असते. आजकाल उच्च शिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो. मुलांची लग्नं करणं ही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी गोष्ट झाली आहे. अशा स्थितीत पैसा येणार कुठून? या खर्चासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करायला हवं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. निवृत्ती नियोजनाप्रमाणेच तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठीही गुंतवणूक केली पाहिजे. याशी संबंधित काही टिप्स जाणून घेऊया.

किती होणार खर्च?कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा खर्च किती मोठा असेल हे पाहावं लागेल. समजा तुमची मुलगी २०३० मध्ये ग्रॅज्युएट होईल. यानंतर तुम्हाला त्याला टॉप बिझनेस स्कूलमध्ये तिला शिकवायचं आहे. यासाठी तुम्हाला फंड तयार करायचा आहे. २०२१ मध्ये IIM अहमदाबाद येथे २ वर्षांच्या एमबीए प्रोग्रामची फी २३ लाख रुपये होती. गेल्या दोन दशकांत हे शुल्क वार्षिक १२ टक्के दराने वाढलं आहे. हिशोब केल्यावर आपल्याला कळेल की २०३० मध्ये ही फी ६४ लाख रुपये असेल. त्याचप्रमाणे, पालकांना सध्याच्या खर्चानुसार प्रत्येक ध्येयासाठी भविष्यातील खर्चाची गणना करावी लागेल. यावरुन तुम्हाला तुमच्या मुलांच्या फायनान्शिअल फ्युचरसाठी केव्हा आणि किती पैशांची गरज भासेल याची माहिती मिळेल.

गुंतवणूक विभागातुमच्या तात्काळ उद्दिष्टांसाठी बचत खाती, एफडी, लिक्विड आणि शॉर्ट टर्म डेटचा वापर करा. तर दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, इक्विटी म्युच्युअल फंड, सोनं आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारखी निश्चित उत्पन्नांची साधनं वापरा. तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता.

महागाईचं गणित समजातुमच्या मुलांच्या आर्थिक नियोजनात उच्च शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे. सामान्य महागाई सुमारे ८ टक्के दरानं वाढत असते, शैक्षणिक महागाई सुमारे १० टक्के दरानं वाढते. अशा परिस्थितीत, तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या पर्यायाची आवश्यकता असेल जो या महागाई दराच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक परतावा देऊ शकेल. १०, १२ किंवा १५ वर्षांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी पालक अधिक आक्रमकपणे गुंतवणूक करू शकतात. संपूर्ण गुंतवणूक इक्विटीमध्ये गुंतवू शकतात. परंतु या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रचंड चढ-उतारांसाठी तयार राहावं लागेल, परंतु येथे तुम्हाला चांगला परतावा मिळण्यास भरपूर वाव आहे.कसा तयार होईल मोठा फंडकुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून मुलांसाठी गुंतवणूक केली तर मोठा निधी तयार होऊ शकतो. अमेरिकेत अनेक ठिकाणी आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू कुटुंबातील सर्व मुलांच्या एज्युकेशन फंडसाठी दरमहा काही रक्कम जमा करतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी रक्कम देऊ शकते. यातून खूप पैसा जमा होतो. हा छोटासा पैसा मोठ्या निधीत भर घालतो. अशा प्रकारे आपण आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकता.

टॅग्स :गुंतवणूकपैसा