Cred CEO Salary : भारतासह जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्यांचे CEO भरगच्च पगार घेतात. पण, क्रेडिट कार्डच्या बिल पेमेंटसाठी लोकप्रिय असलेली कंपनी क्रेड (Cred) ची संपत्ती सुमारे 6480 कोटी रुपये असून, याचे CEO कुणाल शाह दरमहा केवळ 15,000 रुपये पगार घेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कुणाल शहा यांनी स्वतः सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.
कुणाल शाह यांनी इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये आपल्या पगाराचा खुलासा केला. सोशल मीडिया युजर्स त्यांच्या कमी पगार घेण्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. कोणी त्यांचे कौतुक करत आहेत तर कोणी टीका करत आहेत. कमी पगार घेण्यावर शाह म्हणाले की, कंपनीला नफा होत नाही तोपर्यंत मी कंपनीकडून जास्त पगार घेणार नाही.
यादरम्यान एका युजरने शाह यांना प्रश्न विचारला की, एवढ्या कमी पगारात घर कसे चालते, दैनंदिन खर्च कसा निघतो? त्यावर कुणाल शाह म्हणाले, मी कमी पगारामध्ये जगू शकलो, कारण काही काळापूर्वी माझी कंपनी फ्रीचार्ज(FreeCharge) विकली आहे. कुणाल शाहच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत एका युजरने म्हटले की, एका बाजुला आपल्याकडे कोट्यवधींमध्ये पगार घेणारे काही सीईओ आहेत, तर दुसऱ्या बाजुला कुणाल शाह आहेत. दुसर्या युजरने म्हटले की, फक्त टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. अनेक सीईओ पगार घेत नाहीत, कारण त्यांना टॅक्स भरावा लागतो. त्याऐवजी ते स्टॉकमध्ये व्यवहार करतात.
क्रेड तोट्यात आहे
द हिंदू बिझिनेसलाईनच्या अहवालानुसार, वित्तीय वर्ष 2022 मधील क्रेडचा निव्वळ तोटा 1,279 कोटी रुपये होता. कंपनीचा रेव्हेन्यू सुमारे 340 टक्क्यांनी वाढून 422 कोटी रुपये झाला. वित्तीय वर्ष 2021 मध्ये ते 95 कोटी रुपये होता. फिनटेक कंपनीचा आर्थिक वर्ष 2021 मध्ये 524 कोटी रुपये तोटा होता.