Real Estate : कुठल्याही शहरात राहणाऱ्या व्यक्तीचं पहिलं स्वप्न असतं ते हक्काच घर खरेदी करणे. महागाईच्या काळात घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. गेल्या ३ वर्षांत रिअल इस्टेट हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे. गेल्या १५ तिमाहीत देशातील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पूर्वी मुंबई, बेंगळुरू शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील महागाईसाठी प्रसिद्ध होते. मात्र, आता या शहराला मागे टाकत नवीन नाव समोर आलं आहे.
बेंगळुरूपेक्षा येथे किमती अधिक वाढल्या
मुंबईनंतर, रिअल इस्टेटमध्ये जर कोणते शहर महाग मानले गेले असेल तर ते बेंगळुरू आहे. परंतु, 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत, बेंगळुरूच्या तुलनेत दिल्ली-एनसीआरमध्ये रिअल इस्टेटच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. क्रेडाई कोलियर्स लियासेस फोरासच्या अहवालानुसार, देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये दिल्ली-NCR मध्ये सर्वाधिक किमती ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये किमती कुठे वाढल्या?
२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत दिल्ली-NCR मधील घरांच्या किमती ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. द्वारका एक्सप्रेसवे आणि गोल्फ कोर्स एक्स्टेंशन भागात सर्वाधिक ५० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरमधील रिअल इस्टेटच्या वाढलेल्या किमतीची २०२० शी तुलना केली तर ती ७५ टक्क्यांनी वाढली आहे. तर बेंगळुरूमध्ये ही किंमत केवळ २४ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यातील रिअल इस्टेटच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही.
या शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये घट
देशातील ८ मोठ्या शहरांमध्ये १० लाखांहून अधिक घरे तयार आहेत. मात्र, ही घरे विकत घेणारे कोणीच नाही. यामुळे, २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत येथे किमतीत घट दिसून आली आहे. मालमत्ता विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक वार्षिक ४० टक्के आणि पुण्यात १३ टक्के वार्षिक घट दिसून आली आहे. त्याचवेळी चेन्नई आणि कोलकाता येथेही वार्षिक ७-९% घट झाली आहे.
मुंबई-पुणे शहरातील घरांच्या किमती
रिअय इस्टेट क्षेत्रात ४५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंतच्या घरांना परवडणारी घरे म्हणतात. परंतु, ज्या प्रकारे जमिनीच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे परवडणारी घरे बांधणे कठीण झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार परवडणाऱ्या घरांमध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे.