चंद्रकांत दडस, उपसंपादक
काही वर्षांपूर्वी लोक केवळ बँकेत एफडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतं. आता मात्र एकाच वेळी विविध फंड, बचत योजना, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करता येते. त्यातून मोठे रिटर्नही मिळत आहेत. पीपीएफमधील गुंतवणूकही अशीच फायद्याची असून, रोज २०० रुपये गुंतवणूक केल्यास तुम्ही २० लाखांचे मालक होऊ शकता. कसे ते पाहू...
गुंतवणूक किती वाढली?
पीपीएफमधील गुंतवणूक ९ वर्षांत तब्बल १६२ टक्क्यांनी वाढली आहे. २०१३-१४ मध्ये पीपीएफमध्ये ८,१३५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली तर २०२१-२२ मध्ये या बचत योजनेत लोकांनी तब्बल २१,३०३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
असा मिळतो फायदा
छोट्या छोट्या बचतींद्वारे दीर्घकालीन मोठा निधी तयार करण्यासाठी पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ ही तिहेरी कर लाभ असलेली बचत योजना आहे. यामध्ये ठेवी, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या रकमेवर कर सवलत आहे. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. त्यातून रिटर्नही उत्तम मिळतात.
कोण खाते उघडू शकतो?
कोणताही भारतीय व्यक्ती पीपीएफ खाते उघडू शकतो. ते अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही उघडता येतो. कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडू शकत नाही. त्याचे संयुक्त खातेदेखील उघडता येत नाही, परंतु नॉमिनी केले जाऊ शकते.
मुदतपूर्व बंद करण्याचे नियम
पीपीएफ खाते बंद केले जाऊ शकत नाही, परंतु ते विशेष परिस्थितीत बंद होऊ शकते. पीपीएफ खाते उघडल्यानंतर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते बंद केले जाऊ शकते. परंतु असे केल्याने १ टक्के व्याज कमी मिळते. त्यामुळे शक्यतो हे खाते १५ वर्षे सुरू ठेवावे.
एनपीएस गुंतवणूक (कोटींत)
२०१५-१६ ९,६२२
२०१६-१७ १०,३९३
२०१७-१८ १०,४८७
२०१८-१९ १३,५६६
२०१९-२० १८,८८२
२०२०-२१ २०,४५५
२०२१-२२ २१,३०३
कसे वाढतील पैसे?
१५ वर्षांत २० लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना दररोज २०० रुपये म्हणजेच वर्षभरात ७३,००० रुपये जमा करावे लागतील. त्यावर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते. १५ वर्षांत एकूण जमा १०.९५ लाख रुपयांच्या रकमेवर या व्याजदराने २० लाख रुपये रक्कम जमा होईल.
फक्त २०० रुपये जमा करून २० लाखांचे मालक व्हा! कसं ते जाणून घ्या...
काही वर्षांपूर्वी लोक केवळ बँकेत एफडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतं. आता मात्र एकाच वेळी विविध फंड, बचत योजना, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करता येते.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:55 AM2022-08-21T07:55:47+5:302022-08-21T07:58:14+5:30