बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसद्वारेही (Post Office) अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यापैकी एक योजना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates-NSC) आहे. ही योजना खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह उच्च व्याजाची हमी हवी आहे. एनएससी ही एक प्रकारची डिपॉझिट स्कीम आहे ज्यामध्ये 5 वर्षे पैसे जमा करून चांगले व्याज मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर सध्या 7.7% दरानं व्याज दिलं जात आहे. आज आपण एनएससीचे फायदे जाणून घेऊ आणि 10 लाखांच्या रकमेवर किती व्याज मिळू शकतं हे पाहू.
१००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक
एनएससी मधील गुंतवणूक किमान 1000 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते आणि कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजे तुम्ही त्यात कितीही कमाल रक्कम गुंतवू शकता. यामध्ये कोणताही नागरिक खातं उघडू शकतो. जॉइंट अकाउंटची सुविधाही आहे. दोन ते तीन लोक संयुक्त खाते उघडू शकतात. पालक अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात, तर 10 वर्षांपर्यंतची मुले त्यांच्या नावावर एनएससीमध्ये खातं सुरू करू शकतात. तुम्ही एकाच वेळी अनेक एनएससी खाती देखील उघडू शकता.
५ वर्षांनंतर मॅच्युअर होते स्कीम
एनएससीचा एक फायदा असा आहे की यामध्ये तुम्हाला जास्त काळ पैसे जमा करावे लागणार नाहीत. ही स्कीम अवघ्या 5 वर्षात मॅच्युअर होते. यामध्ये वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज देण्यात येतं आणि हमी परतावा उपलब्ध आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या वेळी लागू होणाऱ्या व्याजदरानुसार 5 वर्षांसाठीचा व्याजदर मोजला जातो. यादरम्यान व्याजदर बदलला तरी त्याचा तुमच्या खात्यावर परिणाम होत नाही. कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर कर सूट उपलब्ध आहे, म्हणजेच दरवर्षी 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट मिळू शकते.
पार्शल विड्रॉलची सुविधा नाही
इतर योजनांप्रमाणे यामध्ये पार्शल विड्रॉलची सुविधा नाही. याचा अर्थ, तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी 5 वर्षांनंतर मिळेल. त्याच वेळी, प्रीमॅच्युअर क्लोजर देखील केवळ विशेष परिस्थितींमध्ये केलं जाऊ शकतं.
10 लाखांवर किती रिटर्न
जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 10 लाख रुपये गुंतवले तर 7.7 व्याज दरानं तुम्हाला फक्त 4,49,034 रुपये व्याज म्हणून मिळतील, जे अंदाजे 4.5 लाख रुपये आहे. अशा स्थितीत 5 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 14,49,034 रुपये मिळतील. तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये त्याचा लाभ घेऊ शकता.