Dhanteras 2023 Investments: दीपावली सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनं दिवाळीची सुरुवात होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीचा ट्रेंड असतो. लोक त्या दिवशी सोनं, चांदी, भांडी, नाणी इत्यादी खरेदी करून घरी आणतात. या दिवशी केलेली गुंतवणूक खूप शुभ मानली जाते. असं मानलं जातं की यामुळे घरात समृद्धी येते. यावर्षी धनत्रयोदशी शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी आहे. तुम्हीही ही संधी साधून गुंतवणूक करणार असाल तर अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथून तुम्ही चांगला नफाही मिळवू शकाल. असे काही पर्याय आपण जाणून घेऊ जे फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत उत्तम परतावा देतील.
RBI Bonds
चांगल्या परताव्यासाठी तुम्ही फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्डमध्येही गुंतवणूक करू शकता. यांना RBI बॉण्ड्स असंही म्हणतात. फ्लोटिंग रेट बाँड असल्यानं, त्यावरील व्याज त्याच्या कार्यकाळात सारखेच राहत नाही. या बाँडवरील व्याज दर सहा महिन्यांनी (१ जुलै आणि १ जानेवारी) ठरवले जाते. त्याचे व्याज नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) नुसार ठरवले जात. जुलै आणि जानेवारीलाजे व्याज एनएससी वर दिलं जातं, त्यापेक्षा ३५ बेसिस पॉईंट्स अधिक व्याज संबंधित सहा महिन्यांमध्ये बॉन्ड धारकांना मिळतं. सध्या एनएससीवर ७.७ टक्के व्याज मिळतं. तर आरबीआय बॉन्डवर ते ८.५ टक्के आहे.
VPF
तुम्ही नोकरी करत असाल तर गुंतवणुकीसाठी तुम्ही VPF म्हणजेच वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडाचा पर्याय निवडू शकता. VPF ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार EPF खात्यावर जेवढं व्याज देते तेवढंच व्याज यावर देते. सध्या त्यावर ८.१५ टक्के दरानं व्याज दिले जात आहे. कर्मचाऱ्याची इच्छा असल्यास, तो व्हीपीएफमध्ये मूळ वेतनाच्या १०० टक्के योगदान देखील देऊ शकतो. याचा लॉक इन कालावधी ५ वर्षांचा आहे. व्हीपीएफमध्ये तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. या फंडामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळवू शकता.
SIP
आज, एसआयपीचा समावेश उत्तम रिटर्न देणाऱ्या पर्यायांमध्ये केला जातो. तुम्ही अद्याप एसआयपी सुरू केली नसेल, तर तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी ती सुरू करू शकता. एसआयपी मार्केट लिंक्ड असल्यानं त्यात निश्चित व्याजाची हमी नाही. परंतु तज्ज्ञांनुसार दीर्घकालीन एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. अशा परिस्थितीत, मोठी रक्कम जमा करण्यासाठी एसआयपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही त्यात जितक्या जास्त कालावधीसाठी पैसा गुंतवाल तितकं मोठं भांडवल तुम्ही उभं करू शकता.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )