Gold Price Increased : तुळशीचं लग्न पार पडल्यानंतर आता लगीनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, दुसरीकडे सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत असल्याने लग्नाळू तरुण-तरुणींचा हिरमोड होत आहे. बुधवारी पुन्हा एकदा पिवळ्या धातूने भाव खाल्ला. मजबूत जागतिक कल आणि स्थानिक ज्वेलर्सच्या जोरदार खरेदीळे ही भाववाढ झाली. या काळात चांदीचा भाव प्रतिकिलो ९५,८०० रुपयांवर पोहोचला असून एका दिवसातील सर्वात मोठी ५,२०० रुपयांची उसळी घेतली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने ६५० रुपयांनी वाढून ७८,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. गेल्या दोन व्यवहारात सोन्याचा भाव २,२५० रुपयांनी घसरला होता. मंगळवारी तो ७८,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दरम्यान, यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा हात असल्याचे समोर आले आहे.
सोन्याची किंमत किती रुपयांनी वाढली
२४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव बुधवारी ९५० रुपयांनी वाढून ७८,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. राष्ट्रीय राजधानीत चांदीच्या दरात एकाच दिवसातील सर्वात मोठी ५,२०० रुपयांची वाढ झाली. दोन आठवड्यांच्या अंतरानंतर ते ९५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचले. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी चांदीच्या किमतीत ५,000 रुपयांनी वाढ होऊन एका दिवसातील सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली होती.
चांदीत अचानक वाढ का?
गेल्या २ दिवसांत चांदीच्या दरात २७,००० रुपयांनी घसरण झाली होती. मंगळवारी ती प्रतिकिलो ९०,६०० रुपयांवर बंद झाली होती. पश्चिम आशियातील अस्थिर भू-राजकीय परिस्थिती तसेच देशांतर्गत बाजारपेठेतील औद्योगिक आणि अलंकार क्षेत्रातीत वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढत असल्याचे व्यापारांनी म्हटले आहे.
सोने चांदीच्या भाववाढीवर तज्ज्ञ काय म्हणतात?
LKP सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष, संशोधन विश्लेषक (वस्तू आणि चलन) जतिन त्रिवेदी म्हणाले की, भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या चढउतारांमुळे बाजारपेठेने मजबूत व्यवहार केला. सोन्यामध्ये व्यापक तेजीचा कल कायम आहे. पण, त्यातही अनिश्चितता असल्याचे म्हटले आहे. MCX वर ७५,९०० रुपयांवर सोने त्याच्या शिखरावर थोडेसे खाली आहे. मात्र, अर्थसंकल्प सप्ताहातील ६७,५०० रुपयांच्या वर गेले आहे.
भाववाढीला ट्रम्प कसे कारणीभूत?
भू-राजकीय जोखीम आणि अमेरिकेचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅनमुळे सोन्यामधील गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. सोन्याला आपली हरवलेली जागा परत मिळवण्यास मदत झाली, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. यामुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली, असे गांधी म्हणाले. याशिवाय अमेरिकन डॉलर आणि रोखे उत्पन्नामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आशियाई बाजारात चांदी ०.३३ टक्क्यांनी वाढून ३०.९४ डॉलर प्रति औंस झाली.