Join us  

सणासुदीत गुंतवणूक केली, मग 'या' चुका टाळल्या का?; नेमकं काय करायचं, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:48 AM

गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळायला हवा, हे उद्दिष्ट असते. त्यामुळे या काळात गुंतवणूक करताना ही बाब नेहमी लक्षात ठेवूनच विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे.

नवी दिल्ली : दिवाळी व इतर सणांदरम्यान सोने आणि विशिष्ट समभागांत मोठी गुंतवणूक होत असते. मात्र, मागील वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता अशी माहिती समोर आली आहे की, सणासुदीच्या हंगामात गुंतवणूक केल्याने अधिक परतावा मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याचबरोबर या काळातील गुंतवणुकीतून काही नुकसानही होत नाही.

गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळायला हवा, हे उद्दिष्ट असते. त्यामुळे या काळात गुंतवणूक करताना ही बाब नेहमी लक्षात ठेवूनच विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास निश्चितच लाभ पदरी पडेल. तुम्हाला दिवाळीत बोनस अथवा इन्सेन्टिव्ह मिळत असेल, तर तो पूर्ण खरेदीवर न खर्च करता त्यातील काही रकमेची गुंतवणूक केली पाहिजे. मात्र, ही गुंतवणूक करताना काही बाबींची काळजी घेतली पाहिजे.

एकाच ठिकाणी गुंतवणूक नको  

अशा हंगामी गुंतवणुकीसाठी लोक सर्वोत्तम म्युच्युअल फंड किंवा एखादी मल्टिबॅगर स्टॉक आयडिया शोधत असतात. एकाच ठिकाणी गुंतवणुकीवर त्यांचा भर असतो. तथापि, यातून फार मोठा परतावा मिळेलच, असे नाही. उलट जोखीम वाढते. त्याऐवजी गुंतवणुकीसाठी बहुविध पर्याय निवडायला हवेत. त्यातून जोखीम कमी होते. 

गुंतवणूक पर्याय कायम ठेवा  

दिवाळीत जास्त गोड अथवा जास्त तळलेले खाऊ नका, असे डॉक्टर तुम्हाला बजावत असतात. तुम्हीही या सल्ल्याला चिकटून असता. गुंतवणुकीच्या बाबतीतही तुम्ही पैशाच्या विभागणीस चिकटून राहिले पाहिजे. त्यात असमतोल होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

खर्चावर लक्ष देणेही महत्त्वाचेच   

खरेदी करताना आपण कमीत कमी खर्च कसा होईल, हे पाहतो. तेच तत्त्व गुंतवणुकीतही पाळा. इंडेक्स फंड्स अथवा ईटीएफ यात काही तरी गुंतवणूक अवश्य करा. कारण हे पर्याय तुम्हाला कमी खर्चात चांगला परतावा देत असतात. 

गुंतवणुकीतील सातत्य कायम ठेवा   

दिवाळीत गुंतवणूक करणे चांगलेच आहे; पण गुंतवणुकीत शिस्त कायम राहील, हे पाहा. अनेक लोक दिवाळीनंतर गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतात, असे करू नका. दिवाळीनंतरही गुंतवणूक सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू ठेवा. तुम्ही वेतनधारक असाल, तर एसआयपीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :गुंतवणूक