Elon Musk : टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्ससारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांच्यावर नववर्षात लक्ष्मीची कृपा झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार बुधवारी एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल 14.8 अब्ज डॉलर्स(रु. 12,30,44,53,60,000) वाढ झाली आहे. यासोबतच मस्क यांची एकूण संपत्ती 222 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती बुधवारी $1.51 बिलियनने घसरुन $177 अब्जवर आली. तर, फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट 158 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. बुधवारी त्यांची संपत्ती 2.24 अब्ज डॉलरने घसरली. यावर्षी सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीत अर्नॉल्ट पहिल्या स्थानावर आहे. वर्षाच्या पहिल्या 17 दिवसांत त्यांची एकूण संपत्ती 21.5 अब्ज डॉलरने घसरली आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे 140 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर, अमेरिकन उद्योगपती स्टीव्ह बाल्मर 135 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत, तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग $133 अब्ज संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत. झुकेरबर्गच्या संपत्तीत बुधवारी $2.9 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. मस्क आणि झुकरबर्ग वगळता जगातील सर्व टॉप 20 अब्जाधीशांच्या संपत्तीत बुधवारी घट झाली.
अदानींचा कितवा नंबर...
या यादीत 128 अब्ज डॉलर्ससह लॅरी पेज सातव्या, लॅरी एलिसन ($122 अब्ज) आठव्या, सर्गे ब्रिन ($121 अब्ज) नवव्या आणि वॉरेन बफे ($120 अब्ज) दहाव्या स्थानावर आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 101 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 11 व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी आतापर्यंत अंबानींच्या संपत्तीत 5.15 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बुधवारी गौतम अदानी यांच्या संपत्तीत $2.67 बिलियनची घसरण झाली, त्यामुळे 91.8 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आहेत.