बहुतांश कर्मचारी वर्गाकडे भविष्य निर्वाह निधी (EPF) खातं आहे. ईपीएफ सोबत, कर्मचाऱ्यांकडे कर्मचारी पेन्शन योजना-EPS (Employees' Pension Scheme) खातंदेखील आहे. त्याला पेन्शन फंड असंही म्हणतात. दर महिन्याला पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या कंपनीच्या खात्यातून जमा केली जाते. परंतु, ईपीएसचे पैसे कधी काढता येतील याबाबत लोक गोंधळातच राहतात. काही अटींसह ईपीएसमधून पैसे काढण्याची परवानगी आहे. चला, जाणून घेऊया यासंदर्भातील माहिती.
कसा जमा होतो पैसा
ईपीएफओच्या सध्याच्या नियमांनुसार, कर्मचारी दरमहा त्याच्या पगाराच्या 12 टक्के (Basic Salary+DA) ईएपीएफ खात्यात योगदान देतो. त्याच वेळी, एम्पलॉयरदेखील भविष्य निर्वाह निधी खात्यात समान रक्कम टाकतो. एम्पलॉयरचं 3.67 टक्के योगदान ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केले जाते. परंतु, यामध्ये दरमहा 1,250 रुपयांची मर्यादा आहे. वास्तविक, ईपीएस मध्ये 8.33 टक्के योगदान रुपये 15000 (Basic+DA) वर मोजलं जातं. मात्र, ही मर्यादा हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
कोण काढू शकतं पैसा
EPFO रिटायर्ड एन्फोर्समेंट ऑफिसर भानू प्रताप शर्मा यांच्या मते, ईपीएस खात्यातून एकरकमी पैसे फक्त दोनच परिस्थितीत काढता येतात. ईपीएस नियमांनुसार, जर नोकरी सोडण्यापूर्वीचा सर्व्हिस हिस्ट्री 10 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा कर्मचारी 58 वर्षांचा झाला तर तो पेन्शन फंडाची रक्कम एकरकमी काढू शकतो. तुमचं वय 58 वर्ष असलं तरीही, एकरकमी पैसे काढण्याऐवजी ईपीएस स्कीम सर्टिफिकेटचा पर्याय आहे. त्याच वेळी, जेव्हा कर्मचारी इतर कोणत्याही संस्थेत नोकरीवर रुजू झाला असेल किंवा सर्व्हिस हिस्ट्री 10 वर्षांहून अधिक झाली असेल तेव्हाही योजनेचे सर्टिफिकेट घेता येते.
कशी मोजली जाते सर्व्हिस हिस्ट्री
तुम्ही ईपीएफ योजनेत सामील झाल्यापासून ईपीएफओ वर्षे मोजते. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये सातत्य असणं आवश्यक नाही. याचा अर्थ जर तुम्ही कंपनीत काम करत असताना 2010 मध्ये ईपीएफ योजनेत सामील झालात. येथे 3 वर्षे काम केल्यानंतर नोकरी बदलली. परंतु जर ती कंपनी ईपीएफओच्या कक्षेत येत नसेल. या ठिकाणी तुम्ही 4 वर्ष काम केलं. यानंतर 2017 मध्ये, तुम्ही पुन्हा नोकरी बदलली आणि तिसर्या कंपनीत गेलात, जिथे EPF योजनेचा लाभ उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, 2021 पर्यंतच्या ईपीएस विड्रॉलमध्ये तुमच्या सर्व्हिस हिस्ट्रीची गणना पहिल्या आणि तिसऱ्या कंपनीत घालवलेल्या वर्षांवर आधारित असेल. मधील इतर कंपनीचा इतिहास मोजला जाणार नाही. म्हणजे एकूण 7 वर्षांची तुमची सर्व्हिस हिस्ट्री विचारात घेतली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही एकरकमी पेन्शन फंडातून पैसे काढू शकता.
किती काढू शकता पैसे
ईपीएस योजनेतून एकरकमी पैसे काढण्याची परवानगी केवळ तुमची सर्व्हिस 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास किंवा 58 व्या वर्षी सेवानिवृत्ती झाल्यासच दिली जाते. 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या बाबतीत, तुम्ही ईपीएस योजना 1995 मध्ये दिलेल्या टेबल डीच्या आधारे पैसे काढू शकता.