एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन अर्थात ‘ईपीएफओ’चे सदस्य असलेल्या नोकरदार वर्गाला सरकारने खूशखबर दिली आहे. यात जमा निधीवर सरकारनं ८.१५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली.
ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ रोजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला होता. सरकारने तो मंजूर करीत सर्व विभागीय कार्यालयांना ८.१५% या दराने सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.१०% होता. १९७७-७८ या वर्षानंतरचा हा सर्वांत कमी व्याजदर होता. दरम्यान, तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली हेदेखील तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे.
किती व्याज मिळणार?
जुन्या आणि नव्या दराने मिळणारे व्याज उदाहरणार्थ समजून घेऊ या.
जमा ८.१०% ८.१५%
रक्कम दर व्याज दर व्याज
₹१ लाख ₹८,१०० ₹८,१५०
₹३ लाख ₹२४,३०० ₹२४,४५०
₹५ लाख ₹४०,५०० ₹४०,७५०
ऑनलाइन कसा चेक कराल बॅलन्स?
- तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करून तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. मात्र, यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणे आवश्यक आहे.
- यासाठी सर्वप्रथम EPFO च्या 'MEMBER e-SEWA' वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला वेबसाइटच्या तळाशी 'तुमचा UAN नंबर जाणून घ्या' हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहित असेल, तर तुम्ही थेट त्याच्या वर दिलेल्या 'Activate UAN' या पर्यायावर क्लिक करू शकता.
- आता ऑनलाइन शिल्लक तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या आणि UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- यानंतर पासबुक Download/View Passbook वर क्लिक करा. असे केल्यावर तुमच्या समोर पासबुक ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम पाहता येईल.
एसएमएसद्वारे तपासा
यासाठी तुम्हाला EPFO कडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरून 7738299899 वर "EPFOHO UAN LAN" लिहून मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या खात्याशी संबंधित ईपीएफ बॅलन्ससह इतर माहिती मिळेल.
मिस्ड कॉलद्वारेही माहिती
यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून फक्त 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. रिंग वाजल्यानंतर फोन आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि काही वेळाने तुम्हाला ईपीएफ शिल्लक आणि तुमच्या खात्याशी संबंधित इतर माहिती मेसेजच्या रूपात मिळेल.