EPFO News: गेल्या काही दिवसांत कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. याशिवाय कोट्यवधी सदस्यांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ईपीएफओनं डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीमसाठी (EDLI) नवीन नियम लागू केले आहेत. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेनं नुकत्याच झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत ईडीएलआयमध्ये ही दुरुस्ती केली आहे. या बैठकीत सीबीटीनं आर्थिक वर्ष २०२५ साठी ईपीएफ व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
किमान विमा नियमांमध्ये बदल
ईपीएफओनं शॉर्ट सर्व्हिससाठी मिनिमम इन्शुरन्सचे नियम बदलले आहेत. आता नोकरीची मुदत पूर्ण होण्याआधीच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५०,००० रुपयांचा जीवन विम्याचा लाभ मिळणार आहे. पेन्शन संघटनेच्या या निर्णयाचा दरवर्षी पाच हजार लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
अशा वेळी लाभ मिळेल
यापूर्वी ईपीएफ अंशदानात दीर्घ कालावधीनंतर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याला डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमचा (ईडीएलआय) लाभ मिळत नव्हता. परंतु नियमात बदल झाल्यानंतर जर एखाद्या सदस्याचा मृत्यू त्यानं जमा केलेल्या शेवटच्या अंशदानाच्या ६ महिन्यांपूर्वी झाला तरी त्याला हा लाभ दिला जाईल. मात्र, त्याचं नाव नियोक्ता यादीत असणं बंधनकारक आहे. ईपीएफच्या या सुधारणेचा फायदा दरवर्षी अशा १४,००० हून अधिक प्रकरणांत होण्याची शक्यता आहे.
अंतर विचारात घेतलं जाणार नाही
त्याचबरोबर पेन्शन संस्थेचा तिसरा मोठा बदल सेवेच्या सातत्याच्या मान्यतेशी संबंधित आहे. खरं तर पूर्वी कामाच्या वेळी रविवार किंवा सणासुदीची सुट्टी असे एक-दोन दिवसांचें अंतर असेल तर ईडीएलआयचा लाभ सभासदाला मिळत नव्हता. कारण सेवेतील सातत्य पूर्ण होऊ शकत नव्हतं, पण आता एका नोकरीत आणि दुसऱ्या नोकरीत दोन महिन्यांपर्यंतचं अंतर हे सेवेतील सातत्य मानलं जाणार आहे. ईपीएफओच्या या निर्णयामुळे सदस्यांना अडीच लाख रुपयांपासून ते सात लाख रुपयांपर्यंत ईडीएलआयचा लाभ घेता येणार असून या सेवेमुळे दरवर्षी एक हजार प्रकरणांमध्ये मदत होईल, अशी अपेक्षा आहे.