Join us

EPFO Higher Pension: ईपीएफओच्या हायर पेन्शनच्या पर्याय निवडीसाठी मुदतवाढ, पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 11:14 PM

ईपीएफओच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO नं हायर पेन्शन निवडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

ईपीएफओच्या (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO नं हायर पेन्शन (Higher Pension) निवडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याची मुदत 3 मे रोजी संपत होती. पण ईपीएफओनं ​​आता 26 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. हा पर्याय निवडल्यानंतर ईपीएफओ ​​सदस्यांचं पेन्शन वाढेल. मात्र त्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांना हायर पेन्शनचा पर्याय निवडताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आता हायर पेन्शनचा पर्याय निवडण्याची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी आतापर्यंत केवळ 12 लाख अर्ज आले आहेत.

4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयानं हायर पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यासाठी चार महिन्यांत नवीन पर्याय निवडण्यास सांगितलं होते. नंतर ही मुदत ३ मार्च ते ३ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. यासाठी ऑनलाइन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मात्र पेन्शनचा हिशोब कसा होणार याबाबत संभ्रम आहे. तसंच, पीएफ फंडातून पेन्शन फंडात पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील स्पष्ट नाही. अशा स्थितीत निवड करणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ही तारीख वाढवण्याची मागणी होत होती.

ईपीएफओनं काय म्हटलं?ईपीएफओनं मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं. 3 मे रोजी संपणारी अंतिम मुदत 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आल्याचं यात नमूद करण्यात आलंय. अशाप्रकारे, पात्र कर्मचारी आता हायर पेन्शनसाठी 26 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. EPFO नं 4 नोव्हेंबर 2022 रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर विद्यमान भागधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितलं होतं. या महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने म्हटले होतं की, ईपीएफओनं आपल्या विद्यमान आणि माजी सदस्यांना हायर पेन्शनची निवड करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी काही अटी व व्यवस्थाही ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसा