Join us  

EPFO : घरात लग्न असेल तर PF मधून काढू शकता 'इतके' पैसे, करावं लागेल हे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 1:55 PM

EPFO : पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नासाठी त्यांच्या खात्यातून आगाऊ पैसे काढू शकतात.

EPFO : भविष्य निर्वाह निधी (PF) हे काम करणाऱ्या लोकांसाठी बचतीचं साधन आहे. त्यांच्या मूळ पगाराचा काही भाग पीएफ फंडात जमा केला जातो आणि या रकमेवर सरकारकडून दरवर्षी व्याजही मिळतं. सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी पीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदाराला ८.१५ टक्के दरानं व्याज मिळणार आहे. EPFO नं मार्चमध्ये २०२१-२२ साठी EPF वरील व्याज ८.१ टक्के करण्यात आलं होते. पीएफ खातेधारक गरज पडल्यास त्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे सहज काढू शकतात. ईपीएफओ सदस्य त्यांच्या लग्नासाठी फंडातून आगाऊ रक्कमही काढू शकतात.

ईपीएफओनुसार, सदस्य त्यांच्या लग्नासाठी पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात. याशिवाय सदस्य आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नासाठी आगाऊ पैसे काढू शकतो. तसेच, त्यांच्या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नासाठी पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढण्याची परवानगी आहे. सदस्य त्यांच्या फंडातील व्याजासह ठेव रकमेच्या ५० टक्के रक्कम काढू शकतात. मात्र यासाठी भविष्य निर्वाह निधीचे सदस्यत्व सात वर्षांचं असावे, अशी अट आहे.

किती वेळा पैसे काढता येतात?पीएफ खातेधारकांना हे देखील लक्षात ठेवावं लागेल की ते लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा आगाऊ पैसे काढू शकत नाहीत. तुम्ही घरबसल्या सहजपणे पीएफचे पैसे काढू शकता. ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ ७२ तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता. त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी आहे. ऑनलाइन पैसे काढण्यासाठी, तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले पीएफ खातं असणं आवश्यक आहे. यासोबतच UAN क्रमांकही ॲक्टिव्हेट असला पाहिजे.

किती ईपीएफ होतो कट?कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्यानं केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) मध्ये, तर ३.६७ टक्के ईपीएफमध्ये टाकली जाते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. देशभरात सुमारे ६.५ कोटी EPFO ​​चे ग्राहक आहेत.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीलग्नपैसा